धारावीत दूषित पाण्याचा पुरवठा
राजर्षी शाहूनगर वसाहतीमधील रहिवाशांना पोटाचे विकार
धारावी, ता. २५ फेब्रुवारी (बातमीदार) : धारावीतील राजर्षी शाहूनगर या महापालिकेच्या वसाहतीत गेल्या अनेक दिवसांपासून दूषित व दुर्गंधीयुक्त पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. पोटाच्या विकाराचे आजार वाढले असून, रहिवासी संताप व्यक्त करीत आहेत.
टाकीतील पाणी स्वच्छ असल्याचा दावा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. याबाबत जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांच्या दालनात ३० नोव्हेंबरला बैठक झाली होती. त्या वेळी खासदार वर्षा गायकवाड, आमदार ज्योती गायकवाड, माजी नगरसेविका मरिअम्माल मुत्तू तेवर आणि रहिवासी अरुण भंडारे, मिलिंद राऊळ, नोन्या फणसगांवकर, किशोर प्रभू, बाबर खान उपस्थित होते. लवकरच शाहूनगरमधील भूमिगत पाण्याची जलवाहिनी बदलून दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. अद्याप याबाबत कार्यवाही मात्र झालेली नाही.
भाडेकरू संघाचे अध्यक्ष भरत राऊळ यांनीही याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता जलवाहिनी बदलून देण्याचे आश्वासन दिले होते. दूषित पाण्यामुळे रहिवासी आजारी पडत आहेत, असे येथील डॉ. अनिता किणी यांनी सांगितले. याबाबत तातडीने कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राजर्षी शाहूनगर कल्याणकारी समितीचे माजी अध्यक्ष अरुण भंडारे, विवेक कांबळे यांनी दिला आहे.
वर्षभरापासून त्रास
राजर्षी शाहूनगर ही महापालिकेची वसाहत १९६७ पासून इथे असून, ४७ इमारतींमध्ये जवळपास १ हजार ५० कुटुंबे राहतात. इथे सर्वसाधारण भाडेकरू आणि महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी, नर्सिंग स्टाफ, पोलिस कर्मचारी, फायर ब्रिगेड कर्मचारी राहतात. पाणी सोडल्यानंतर सुरुवातीला अतिशय घाणेरडे व दुर्गंधीयुक्त, मलमूत्र मिश्रित पाणी गेल्या वर्षभरापासून येत असल्याचे रहिवाशांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.