‘एमएमआरडीए’वर लाचखोरीचे आरोप
फ्रान्सच्या उच्च अधिकाऱ्याची दिल्लीतील निवासी आयुक्तांकडे तक्रार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : फ्रान्सच्या सिस्ट्रा कंपनीने एमएमआरडीएवर लाचखोरीचा गंभीर आरोप केला आहे. सिस्ट्राकडून एमएमआरडीएला मेट्रो प्रकल्पांच्या उभारणीसाठी कन्सल्टिंग सेवा पुरवण्यात आली आहे. त्याच्या प्रलंबित बिलाची रक्कम मिळावी म्हणून पत्रव्यवहार केला असता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लाच मागण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप सिस्ट्राने केला आहे. याप्रकरणी फ्रान्सच्या उच्च अधिकाऱ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या दिल्लीतील निवासी आयुक्तांकडे तक्रार केली आहे. हे प्रकरण राज्य सरकारपर्यंत पोहोचल्याने खळबळ उडाली आहे.
एमएमआरडीएच्या मुंबईतील प्रमुख मेट्रो प्रकल्पांच्या संदर्भात सिस्ट्रा कंपनीकडून कन्सल्टिंग सेवा पुरवली जाते. २०२३ पूर्वी सर्वकाही सुरळीत सुरू होते; पण त्यानंतर एमएमआरडीएमध्ये प्रमुख वरिष्ठ अधिकारी आल्यापासून आमची बिले थकवण्यात आली आहेत. तसेच ही बिले काढण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप सिस्ट्रा कंपनीने केला आहे. त्याबाबतचे पत्र फ्रान्स राजदूत कार्यालयाच्या वतीने उच्च अधिकारी बेनाॅईट ग्वाईटर यांनी राज्याच्या दिल्लीतील निवासी आयुक्तांना दिले आहे; त्यानुसार संबंधितांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवत एमएमआरडीकडून खुलासा मागितला आहे. त्यामुळे एमएमआरडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. याप्रकरणी एमएमआरडीएकडे विचारणा केली असता सिस्ट्रा कंपनीने केलेले आरोप निराधार असून त्यामध्ये तथ्य नाही; संबंधित कंपनीच्या कामात अनियमितता आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानेच त्यांच्याकडून आरोप करण्यात आल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे.
..
मुंबई मेट्रो प्रकल्पांची रचना आणि देखरेख करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सिस्ट्रा या फ्रेंच कंपनीने एमएमआरडीएवर लाचखोरीचा आरोप केला आहे. हा प्रकार धक्कादायक असून हे प्रकरण फ्रेंच दूतावासापर्यंत पोहोचले आहे. याचा थेट फटका जागतिक आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईच्या विश्वासार्हतेला बसला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गंभीर दखल घेत आरोपांची सीबीआय चौकशी करावी, तसेच ही चौकशी पारदर्शक व्हावी, यासाठी महानगर आयुक्तांसह वरिष्ठ एमएमआरडीए अधिकाऱ्यांची बदली करण्यात यावी.
- वर्षा गायकवाड, खासदार, काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.