रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचणार नाही यासाठी उपाययोजना करा
अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ ः मुंबईत अतिवृष्टीच्या काळात उपनगरीय रेल्वेसेवा ठप्प झाल्यास जनजीवन विस्कळित होते. प्रवाशांना तासनतास अडकून पडावे लागते. गेल्यावर्षी चुनाभट्टी, भांडुप रेल्वे स्थानकांत पाणी साचल्याने रेल्वेसेवा ठप्प झाली. या वर्षी त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी रेल्वे स्थानकांच्या ठिकाणी पावसाळ्यात महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्या समन्वयाने उपाययोजना आखाव्यात. पालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी संयुक्त स्थळ पाहणी करावी. दीर्घकालीन कायमस्वरूपी तोडगा काढण्याबरोबरच विविध पर्यायांची चाचपणी करावी. नागरिकांना दिलासा मिळेल, अशा तऱ्हेने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले.
पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी १८ फेब्रुवारीला पावसाळा पूर्वतयारी आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत रेल्वे प्रशासनातर्फे मध्य रेल्वे मार्गावरील चुनाभट्टी, भांडुप रेल्वे स्थानकांबाबत काही मुद्दे उपस्थित केले होते. या मुद्द्यांचा निपटारा करण्याच्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी पर्जन्य जलवाहिन्या खाते, पूल खाते आणि रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
चुनाभट्टी रेल्वे स्थानकाबाबत पर्जन्य जलवाहिन्या विभागाने हायवे सोसायटीकडून येणारे पावसाळी पाणी दोन उच्च क्षमतेचे पंप लावून नाल्यामध्ये सोडावे; जेणेकरून हे पाणी चुनाभट्टी रेल्वे स्थानक दिशेला जाणार नाही. चुनाभट्टीकडे जाणारी पावसाळी जलवाहिनी ही महामार्ग ओलांडून झोपडपट्टी क्षेत्राबाहेर रेल्वे हद्दीतून बाहेर काढावी आणि पुढे ही जलवाहिनी पश्चिमेकडील नाल्यास जोडावी, अतिरिक्त पावसाळी पाणी मिठी नदीकडे वळवावे, असा पर्याय सुचविण्यात आला. हा प्रस्ताव व्यवहार्य वाटल्यास त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, असे निर्देश बांगर यांनी दिले.
छोटा पूल न पाडल्यास भांडुपमध्ये पाणी तुंबणार
उषानगर (भांडूप) येथे पूल विभागामार्फत पूल, कल्वर्टचे काम सुरू आहे. त्या ठिकाणची समांतर जलवाहिनी स्थलांतरित करून छोटा पूल पाडणे आवश्यक आहे अन्यथा गेल्या वर्षाच्या पावसाप्रमाणे पाणी साचण्याची दाट शक्यता आहे. १५ मे २०२५ पर्यंत जलवाहिनी स्थलांतर केली जाईल तसेच जीर्ण पूल निष्कासन करण्याबाबत दक्षता घेतली जाईल, असे पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत नमूद केले. माटुंगा येथे रुळाखालून पावसाळी जलवाहिनी विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. त्याची लांबी ८०० मीटरपर्यंत वाढवावी, त्यामुळे त्याची उपयुक्तता वाढेल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.