भाईंदर, ता. २६ (बातमीदार) : मिरा रोड येथील बेवर्ली पार्क भागात असलेल्या मलनिस्सारण केंद्राच्या विस्तारीकरणाला स्थानिक रहिवाशांकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे. आधीच या केंद्रामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे, त्यात त्याचे विस्तारीकरण केल्यास त्याचा रहिवाशांच्या आरोग्यावर आणखी विपरित परिणाम होईल. त्यामुळे हे केंद्र रहिवासी क्षेत्रापासून लांब स्थलांतर करण्यात यावे, अन्यथा रहिवासी आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
बेवर्ली पार्क भागातील आरक्षण क्रमांक २६९ या उद्यानालगत महापालिकेचे मलनिस्सारण केंद्र आहे. आता या केंद्रांचे विस्तारीकरण करण्यात येत असून त्यासाठी परिसरात लावण्यात आलेली झाडेदेखील तोडण्यात येणार आहेत. या मलनिस्सारण केंद्राला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. मुळात सध्या असलेल्या मलनिस्सारण केंद्राचा आसपासच्या सुमारे २५ गृहसंकुलांना त्रास होत आहे. केंद्रातून येणाऱ्या दूर्गंधीमुळे रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. या केंद्राचे विस्तारीकरण झाल्यास रहिवाशांच्या त्रासात भर पडणारच आहे, शिवाय उद्यानात येणाऱ्यांनाही त्रास होणार असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. दोन वर्षांपूर्वीदेखील केंद्राच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव होता. त्यावेळीही रहिवाशांनी विरोध केल्यामुळे विस्तारीकरण पुढे ढकलण्यात आले होते, मात्र आता पुन्हा केंद्राच्या विस्तारीकरणाची तयारी सुरू झाली आहे.
माजी नगरसेवक संजय थेराडे यांच्या नेतृत्वाखालील रहिवाशांच्या एका शिष्टमंडळाने यासंदर्भात मिरा-भाईंदर महापालिकेचे शहर अभियंता दीपक खांबित यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या निवेदनाचा योग्य तो विचार करू, असे आश्वासन खांबित यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.
शेकडो झाडांची कत्तल
या भागात सुमारे दीड ते दोन हजार कुटुंब रहात आहेत. या उद्यानात सकाळी, संध्याकाळी अनेक लोक फिरायला येत असतात. मलनिस्सारण केंद्राचे विस्तारीकरण झाले, तर उद्यानाचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट होऊन फिरायला येणाऱ्यांच्या आरोग्यवरही परिणाम होऊ शकतो. शिवाय केंद्रासाठी शेकडो झाडे तोडली जाणार असल्याने पर्यावरणावरही परिणाम होणार आहे असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.