रायगडमध्ये महाशिवरात्रीचा उत्साह
हजारो भाविकांनी घेतले महादेवाचे दर्शन
अलिबाग, ता. २६ ः रायगड जिल्ह्यात महाशिवरात्रीनिमित्त भक्तांचा मेळा फुलला होता. अलिबागसह खोपोली, माणगाव, रोहा आदी ठिकाणी शिवमंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबर जत्रोत्सवाचे वातावरण होते. पहाटेपासून भक्तांनी आपल्या जवळील शिवमंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी भली मोठी रांग लावली होती. अनेक ठिकाणी गावातून पालख्या काढण्यात आल्या. यामध्ये ग्रामस्थांसह पर्यटकांनीदेखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. तसेच जिल्ह्यात महाशिवरात्रीनिमित्त चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
................
खोपोलीत भक्तिमय वातावरणात पूजा
खोपोली (बातमीदार) ः खोपोलीसह खालापुरात महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम पार पडले. खोपोलीतील पेशवेकालीन भगवान वीरेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर सजला होता. तालुक्यातील सर्वच मंदिरांत महाशिवरात्रीनिमित्त भोले शंकराचा जयजयकार व भक्तीमय वातावरण होते.
खोपोलीचे ग्रामदैवत असलेले भगवान वीरेश्वर मंदिरात भाविकांची सर्वाधिक गर्दी झाली होती. वरची खोपोली ग्रामस्थ मंडळ, वीरेश्वर मित्रमंडळ व वीरेश्वर मंदिर व्यवस्थापन कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने दिवसभर भजन, कीर्तन व महाप्रसादासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा लाभ भाविकांनी घेतला. खोपोलीत बाजारपेठेला लागून असलेले पुरातन भैरवनाथ मंदिर, भानवज-मोगलवाडी येथील भव्य बारा जोतिर्लिंग मंदिर, शिळफाटा येथील ऐतिहासिक महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली होती. वीरेश्वर मंदिरात पहाटे चार वाजल्यापासून महापूजा सुरू होती. शहराचे ग्रामदैवत असलेले वीरेश्वर भगवान मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. दिवसभरात किमान २० हजारांच्या वर भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतल्याचा अंदाज वीरेश्वर मंडळ देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या वर्षी भाविकांची वाढती गर्दी पाहता वीरेश्वर मित्रमंडळ व वरची खोपोली ग्रामस्थ मंडळाकडून चोख व्यवस्था करण्यात आली होती. शहरात पारंपरिक प्रथेनुसार सायंकाळी भगवान वीरेश्वर पालखी सोहळा पार पडला. यात शहरातील भाविकांसह पर्यटकदेखील सामील झाले होते. या वेळी पालखी मिरवणूक वीरेश्वर मंदिरापासून सुरू होऊन वरची खोपोली, मुख्य बाजारपेठमार्गे शहरातून पुन्हा मंदिर परिसरात पालखी सोहळ्याची सांगता.
....................
माणगावच्या संगमेश्वर मंदिरात महादेवाचा जप
माणगाव (बातमीदार) ः जुने माणगाव येथील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या संगमेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. महाशिवरात्रीनिमित्त सकाळी चार ते सहा वाजता अभिषेक, त्यानंतर सकाळी सात वाजल्यापासून संपूर्ण दिवसभर दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. दिवसभर दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती. सायंकाळी साडेसात वाजता महाआरती करण्यात आली. या महाआरतीला भक्तगणांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. दरम्यान, भक्तिमय वातावरणात महाशिवरात्री साजरी करण्यात आल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय अण्णा साबळे यांनी सांगितले.
मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव तालुका रायगड जिल्ह्यातील आकाराने सर्वात मोठा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. येथील काळ आणि गोद नदीच्या संगमावरील संगमेश्वर देवस्थान मंदिराच्या जीर्णोद्धारामुळे व मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेमुळे माणगावला धार्मिकदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. १६३० रोजी माणगावमध्ये जोगळेकर या शेतकऱ्याला शेत नांगरताना फाळाला टणक दगड लागला व त्यातून पाणी येऊ लागले. पहिल्या दिवशी जोगळेकरांनी त्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी दूध येऊ लागले. तर तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी रक्त येऊ लागले. त्यामुळे गावामध्ये आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर गावकऱ्यांना या जागेवर एक मोठी शिवपिंड आढळली. तेव्हापासून या स्थानाला संगमेश्वर असे संबोधण्यात येऊ लागले. त्यानंतर माणगावला धार्मिक महत्त्व प्राप्त होऊ लागले. या मंदिराच्या जवळच मारुतीचे मंदिर आहे. श्री क्षेत्र संगमेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी अभिषेक पूजा, अर्चा नित्यनियमाने केली जाते. जुने माणगाव येथील संगमेश्वर मंदिर हे संपूर्ण माणगावकरांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात दरवर्षी दीपोत्सव, महाशिवरात्री, त्रिपुरारी पौर्णिमा भक्तिवाभावाने साजरी केली जाते. तसेच श्रावणी सोमवारला या मंदिरात भाविकांची दिवसभर उपस्थिती असते. यावर्षीही संगमेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. या वेळी कनोजे अण्णा, वैभव साबळे, सचिन गोरेगावकर, शेखर जाधव, पुजारी हरेश जंगम, महेंद्र दळवी, जितेंद्र जाधव, मालुसरे गुरुजी, दिलीप पारखे आदी मान्यवर व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. स्वयंसेवक म्हणून अनिरुद्ध अकॅडमी डिझास्टर मॅनेजमेंट कंपनीचे स्वयंसेवक उपस्थित होते.
.......................
पोलादपुरातील महादेव डोंगरावर भविकांची गर्दी
पोलादपूर (बातमीदार) ः गिरी शिखरावरील पोलादपूर शहराच्या समोर सावित्री नदीच्या पलीकडील उंच डोंगर टेकडीवर महादेवाचा डोंगर हे देवस्थान शिवभक्तांचे श्रद्धास्थान मानले जाते. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी स्वयंभू श्री शंकराच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. यावर्षीदेखील महादेवाचा डोंगर येथे शेकडो भाविकांच्या उपस्थितीमध्ये महाआरती व विधिवत पूजा करून महाशिवरात्री साजरी करण्यात आली. या वेळी पहाटे चार वाजल्यापासूनच भाविकांनी उंच टेकडीवर महादेवाचा डोंगर येथे दर्शनासाठी गर्दी केली होती. काही शिवभक्तांना सकाळी गंगा घाट येते पवित्र स्नान करून महादेवाचा डोंगर येथे जाण्याचा मार्ग पकडला. तसेच मागील चार दिवसांपासून पोलादपुरातील शिवभक्तांनी महादेव डोंगर येथे जाण्यासाठी ठिकठिकाणी पाऊलवाटेची साफसफाई, अवतीभोवती परिसराची स्वच्छता, रंगरंगोटी व सुशोभीकरण केले आहे. यामध्ये नियोजन प्रमुख दीपक हरिभाऊ उतेकर, रवींद्र राजाराम भुवड, संतोष चिकणे, सचिन मेहता, राजू मोरे, पप्पू पार्टे, अवधूत मोहिरे तसेच छोटे सहकारी शिवानी मेहता, अथर्व मंगेश चिकणे, अथर्व शेठ यांनी मेहनत घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.