खालापुरात वणव्यांच्या प्रमाणात वाढ
वनसंपदेचे अतोनात नुकसान; ठोस उपाययोजना करण्याची मागणी
खालापूर, ता. २५ (बातमीदार) ः सह्याद्री पर्वतरांगेत मानवनिर्मित वणव्यांचे प्रमाण वाढले आहे. येथील शेकडो हेक्टर परिसर जळून खाक झाला आहे. वनविभागाने गाव, वाडीवस्तीवर स्थानिकांच्या मदतीने वणवा प्रतिबंधक उपाययोजनेसाठी कंबर कसली आहे; मात्र त्याचा तितकासा उपयोग होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे वन विभागाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी पोलादपूरवासीयांकडून करण्यात येत आहे.
खालापूर तालुक्याला दहा हजार हेक्टरचे वनक्षेत्र लाभले आहे; मात्र मागील काही वर्षांपासून या परिसरात वणव्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भातशेतीबरोबर वनसंपदेचे नुकसान होत आहे. सुकलेले गवत आणि उन्हाच्या वाढत्या झळा यामुळे छोटी ठिणगी क्षणार्धात मोठ्या आगीत रूप घेत आहे. प्रचंड वेगाने पसरत जाणारी आग आटोक्यात आणताना वन विभागाची दमछाक होत आहे. डोंगर परिसर आगीत पूर्णता जळून खाक होत असल्यानेे येथील औषधी, दुर्मिळ वृक्ष, सरपटणारे प्राणी नष्ट होत आहेत. खालापुरात दिवसाआड आगीची घटना घडत असल्याने वनसंपत्तीवर मोठ्या प्रमाणात घाला घातला जात आहे. मानवनिर्मित वणव्यामुळे निसर्गाचे झालेले नुकसान भरून येण्यासाठी १५ ते २० वर्षांचा कालावधी जातो. पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती कार्यक्रम राबविणे आवश्यक असून वनविभागाची यंत्रणा दुर्गम भागात आग विझविण्यासाठी तोकडी पडत असल्याचे वनप्रेमींकडून सांगण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणावर पशु-पक्ष्यांचा चारा आणि अधिवास नष्ट होत आहे. जंगलातील लाकूडफाटा गोळा करण्यासाठी वाट तयार करणे, तसेच जंगली ससे पकडण्यासाठी असे प्रकार केले जात आहेत. सुकलेले गवत भरभर पेटत जाऊन कित्येक किलोमीटरचा परिसर आगीच्या विळख्यात येत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वणवे लागू नयेत, यासाठी स्थानिक पातळीवर वनविभागाने जनजागृती अभियान सुरू केले असल्याचे वनसंरक्षक कल्पना बांगर यांनी सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.