शेताच्या बांधावरच हिरव्यागार भाजीची विक्री
स्थानिक महिलांना व्यवसायाचे साधन
वसई, ता. ४ (बातमीदार) : नुकतीच शेतातून काढलेली हिरवीगार भाजी त्वरित तुमच्यासमोर विक्रीला येते आणि क्षणातच नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होत असते. हे चित्र वसईत दिसून येऊ लागले आहे. हिरव्यागार भाजीची शेताच्या बांधावर महिला विक्री करीत आहेत. त्यामुळे त्यांना अर्थार्जनाचा नवा मार्ग सापडला आहे.
वसईत विविध भाज्यांची लागवड केली जाते. सध्या फ्लॉवर, कोबी, कांदे, मुळा, गवार, भेंडी, पालक, मेथी, बीट, अलकोस, कोथिंबीर, वालशेंगा, वांगी यांसह अन्य भाज्यांची लागवड केली आहे. शहरात जाऊन विक्री करण्यात वेळ, पैसा अधिक खर्च होतो. त्यामुळे स्थानिक महिला शेतातून भाजी काढल्यावर बांधावर टोपली घेऊन भाजीविक्रीसाठी बसतात. भुईगाव, गास, डोंगरीसह आजूबाजूच्या परिसरात या महिला व्यवसाय करीत आहेत. या भागात नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. कळंब, राजोडी, नालासोपारा, वसई, भुईगाव व आजूबाजूच्या परिसरात मुंबईहून नागरिक येत असतात. त्यांना हिरव्यागार भाजी खरेदीचा मोह आवरत नाही. आपसूकच त्यांची पावले बांधावर वळतात व खरेदी करून पुढील मार्ग धरू लागतात, त्यामुळे येथील महिलांना व्यवसायाचे साधन उपलब्ध झाले आहे.
मेथीची जुडी २० रुपये
सायंकाळी याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी अधिक होत असते. मुळा, कोथिंबीर, पालक, मेथीची २० रुपये जुडी तर एक फ्लॉवर २० रुपयांना मिळत आहे. याचबरोबर वाल व शेवग्याच्या शेंगा, वांगी यासह अन्य भाज्या एकाच ठिकाणी आणि त्याही हिरव्यागार व ताज्या असल्याने नागरिक खरेदी करीत आहेत. शहरात जाऊन विक्री करण्यास वेळ, पैसा अधिक लागतो, त्यापेक्षा बांधावरच भाजीपाला व्यवसाय करीत आहोत. नागरिकांचीदेखील खरेदीला पसंती असते, त्यामुळे व्यवसाय होत आहे, असे येथील भाजीपाला विक्रेत्या महिलांनी सांगितले.
ताजी आणि हिरवीगार भाजी वसईत मिळत आहे. शेतातून काढून लगेच विक्री केली जात असल्याने भाज्या खरेदी केल्या. या भागात आल्यावर आम्ही नेहमीच भाज्या घेत असतो.
- श्वेता मसूरकर, खरेदीदार महिला
वसई : पश्चिमेकडे भुईगाव-वसई मार्ग येथे बांधावर भाजीविक्रेत्या महिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.