ठाणेकर अनुभवणार गंगा आरती
वाराणसीहून येणार पंडित : पाडव्याच्या पूर्वसंध्येला भव्य आयोजन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : भक्ती आणि शक्तीचा कुंभ असलेल्या वाराणसीच्या गंगा आरतीची अनुभूती घेण्याचा योग यंदा ठाणेकरांना ठाण्यातच येणार आहे. गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्षाचे स्वागत करताना श्री कौपिनेश्र्वर सांस्कृतिक न्यासने हा योग जुळवून आणला आहे. स्वागत यात्रेचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने श्री कौपिनेश्र्वर मंदिर न्यासने २८ मार्चला उपवन येथे तर २९ मार्चला मासुंदा तलाव येथे गंगा आरतीचे आयोजन केले आहे. त्यासाठी वाराणसीहून पंडितही येणार असल्याने ठाणेकरांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.
होळीनंतर ठाणेकरांना नववर्ष स्वागताचे वेध लागतात. ठाण्यात श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे दरवर्षी स्वागत यात्रा काढून नववर्षाची गुढी उभारली जाते. यंदा या नववर्ष स्वागत यात्रेचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त न्यासाकडून महिनाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विशेष करुन तरुणांचा सहभाग वाढविण्यासाठी आयोजकांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. यासाठी स्वागत यात्रेची तयारीदेखील आयोजकांनी चार महिन्यांआधीपासून सुरू केली. जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजक शहरातील महाविद्यालयांशी समन्वय साधत आहेत. महाविद्यालयांमध्ये विविध व्याख्यानांचे आयोजन करत आहेत.
नृत्यधारा कार्यक्रम
युवादिनानिमित्त न्यासाकडून युवा दौडचे आयोजनदेखील करण्यात आले होते. युवा दौडमध्ये मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. आता १२ मार्च रोजी ‘भारत २०४७- युवकांचा सहभाग’ या विषयावर व्याख्याते दीपक करंजीकर यांचे व्याख्यान होणार आहे, तर शनिवार, २२ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता श्री कौपिनेश्वर मंदिर प्रांगणात नृत्यधारा हा कार्यक्रम होणार आहे. यात ठाण्यातील विविध नृत्य संस्थांचे सादरीकरण असणार आहे, तर रविवार, २३ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता भव्य सांगीतिक कार्यक्रम होणार आहे, तर यंदा वाराणसी येथील पंडितांकडून भव्य गंगा आरतीची अनुभूती ठाणेकरांना अनुभवता येणार आहे. २८ मार्च रोजी उपवन येथे, तर २९ मार्च रोजी मासुंदा तलाव येथे ही गंगा आरती होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.