महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
तारापूरमध्ये चारशेहून अधिक नागरिकांची तपासणी
पालघर, ता. ४ (बातमीदार) : तारापूर अणुशक्ती केंद्र आणि जिल्हा परिषद, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र तारापूर येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर पार पडले. या वेळी तारापूर आणि पंचक्रोशीतील चारशेहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. आरोग्य शिबिरासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मऱ्हाड उपस्थित होते.
शिबिरामध्ये नागरिकांसाठी विविध आरोग्य तपासण्या आणि उपचार सेवा पुरवण्यात आल्या. रक्तदाब, रक्तशर्करा, मुखाचा, स्तनाचा आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग तपासणी, तसेच गरोदर माता आणि नवजात बालकांच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या, याशिवाय सिकल सेल, सामान्य आजारांचे निदान व उपचारदेखील देण्यात आले.
पालघर जिल्ह्यात गर्भवती महिलांमध्ये वाढत्या रक्ताक्षयाच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर, तारापूर अणुशक्ती केंद्राच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत आरोग्य विभागाला एफ. सी. एम. इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले. यासोबतच अत्याधुनिक तोंडाचा कर्करोग तपासणी यंत्र आणि सिकल सेल निदान यंत्राचे लोकार्पण व गरोदर महिलांसाठी ‘सुपोषण किट’चे वाटपदेखील करण्यात आले
या शिबिराला तारापूर अणुशक्ती केंद्राच्या सामाजिक उपक्रमांचे प्रमुख मिश्रा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. सागर पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तनवीर शेख, तसेच तारापूर अणुशक्ती केंद्राचे अधिकारी डॉ. श्याम बिहारी आणि प्रभुपाद दास यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनामध्ये डॉ. वैभवी देशपांडे, डॉ. उमेश अहिरे, मानसेवी वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक-सेविका, गटप्रवर्तक आणि आशा ताई यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.