वसई, ता. ९ (बातमीदार) : नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडून उसने मिळत नाही. ते स्वतःलाच निर्माण करावे लागते, त्यासाठी सोबत खंबीर पाठिंबा असेल तर यश खेचून आणता येते, अशा महिलांना उद्योगक्षेत्रात भरारी घेता यावी, यासाठी वसई-विरार महापालिकेकडून आराखडा तयार करण्यात आला आहे. शहरातील बचत गटाच्या महिलांना त्या योजनांचा फायदा मिळत आहे.
स्वयंरोजगाराकरिता २०२४-२५ मध्ये १५५ बचत गटांना एकूण तीन कोटी ७५ लाख, तर २०२५-२६ मध्ये ८० बचत गटांना एकूण एक कोटी २० लाख भांडवल विविध बँकांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यातून महिलांनी किराणा दुकान, खानावळ, बेबी सेटिंग, घरघंटी चक्की, मसाले कांडप दुकान, शिलाई काम, कपडे विक्री, ज्वेलरी बनवून त्याची विक्री, तर निर्माल्यापासून कंपोस्ट खत, निर्माल्यातील टाकाऊ फुलांपासून राखी व विविध दागिने बनवण्याचे उद्योग उभारले आहेत.
वसई-विरार महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अनिल कुमार पवार यांनी सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक साक्षरता, कौशल्य प्रशिक्षणे, उद्योजकता व व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा, सण-उत्सवाच्या काळात शहरात विविध ठिकाणी विक्री प्रदर्शने व बाजारपेठा उपलब्ध केल्या आहेत. महिलांना व्यवसायासाठी प्रशिक्षित करून रोजगार मिळविण्याची संधी निर्माण करून दिली आहे.
शहरातील १३४ महिला बचत गटांना उद्यान देखभाल व व्यवस्थापन करण्यासाठी ठेका देऊन महिला उद्योजिका घडविण्याचा पहिला मान महाराष्ट्रातून वसई-विरार महापालिकेने मिळवलेला आहे. उद्यान देखभाल करतानाच गणेशोत्सवाच्या काळात जमा होणाऱ्या निर्माल्यापासून कंपोस्ट खत बनविण्याचे प्रशिक्षण महिला बचत गटांना दिले जाते. त्याद्वारे गटांकडून मोठ्या प्रमाणावर कंपोस्ट खताची निर्मिती करून विक्री केली जाते.
शेकडो बचत गटांची नोंदणी
दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत एक हजार ९६६ महिला बचत गट स्थापन करून नोंदणी करण्यात आलेले आहेत. या बचत गटांमध्ये महिला, तृतीयपंथी, दिव्यांग लाभार्थी बचत गट समाविष्ट आहेत.
महापालिका निधीतून रोजगार
सरकारच्या पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजना, स्वनिधी से समृद्धी योजना, कर देयक वाटप, स्वच्छ भारत अभियानअंतर्गत स्वच्छतादूत अशा विविध योजनांमध्ये बचत गट महिलांचा सहभाग वाढवण्यात आला आहे. महापालिका निधीतून बचत गटांना रोजगार निर्मिती करून देण्यात आली आहे, अशी माहिती शहर व्यवस्थापिका रूपाली कदम यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.