बदलापूर, ता. १२ (बातमीदार) : निसर्गाचा गोड्या पाण्याचा एकमेव स्रोत असणाऱ्या नदी संवर्धनासाठी अनेक सामाजिक, निसर्गप्रेमी संस्था पुढे येत असतात. मात्र, आपल्या गावची ओळख आणि पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या बदलापूरजवळील चामटोली नदीच्या संवर्धनासाठी येथील गावकरी पुढे आले आहेत. कचरा, निर्माल्य फेकणाऱ्यांना मज्जाव करण्यासाठी अखेर नदीवरील पुलावर लोखंडी रेलिंग टाकून जाळी बसवण्यात आली आहे.
वांगणी-बदलापूर दरम्यान राहणाऱ्या ग्रामस्थांना आणि या परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्त्रोत असणाऱ्या चामटोली नदीत अनेक नागरिक सर्रासपणे कचरा, घरातील निर्माल्य टाकून नदी अस्वच्छ करत होते. त्यामुळे नदीत मोठ्या प्रमाणात घाण व प्लॅस्टिकचा कचरा साचला होता. प्रत्येक वर्षी येथील ग्रामस्थांच्या माध्यमातून नदीची स्वच्छता करण्यात येते. आता कचरा आणि निर्माल्य टाकणाऱ्यांवर बंदी घालण्यासाठी येथील ग्रामस्थांनी शक्कल लढवत नदीवर उभारण्यात आलेला वाहतुकीच्या पुलावर लोखंडी रेलिंग टाकून जाळी बसवली आहे. नियमितपणे परिसरातील रहिवासी या पुलावरून ये-जा करताना कचरा आणि निर्माल्य या नदीत टाकत असतात. त्याचाच परिणाम म्हणून नदी अस्वच्छ होऊन तिचे पाणी दुर्गंधीयुक्त झाले होते. अखेर येथील गावकऱ्यांनी एकत्रित येऊन, स्वखर्चातून या पुलावर लोखंडी संरक्षण जाळी बसवली आहे. त्यामुळे आता कोणालाही या नदीत कचरा किंवा निर्माल्य टाकता येणार नाही.
गावकऱ्यांकडून विनंती
स्थानिक नागरिकांनीही नदी स्वच्छ राहण्यासाठी आपणच आपल्याकडून स्वच्छतेचे एक पाऊल पुढे टाकून कचरा, निर्माल्य या नदीत टाकू नये, अशी विनंती गावकऱ्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.