बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर पशुवैद्यकीय विभाग सतर्क
कल्याण, ता. १२ (बातमीदार) : ठाण्यात कोपरी आणि कल्याण तालुक्यात नडगाव इथे बर्ड फ्ल्यूने बाधित पक्षी आढळल्यानंतर ठाणे जिल्ह्याचा पशुवैद्यकीय विभाग सतर्क झाला आहे. ठाण्याच्या कोपरीतून ३६, कल्याण नडगाव इथून ३५१ तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून ६०० हून अधिक नमुने पुण्याला परीक्षणासाठी पाठवले आहेत. त्यामुळे काळजीचे कारण नसले तरी बाहेर उघड्यावर चिकन खाणाऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
महिनाभरापूर्वी उरण, ठाणे, कल्याण इथे बर्ड फ्ल्यूबाधित पक्षी आढळले होते. त्यानंतर सतर्क झालेल्या ठाणे जिल्ह्याच्या पशुवैद्यकीय विभागाने बाधित क्षेत्राच्या एक किलोमीटर परिसरातील पक्षी नष्ट केले होते; मात्र राज्यात आजही बर्ड फ्ल्यूचा उद्रेक सुरू असल्याने संशयित पक्षी, पोल्ट्रीचालकांच्या कोंबड्यांचे नमुने तपासणीला जात आहेत.
६०० हून अधिक नमुने तपासणीला
पशुवैद्यकीय विभागाचे कर्मचारी सध्या जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष जात असून आजारी पक्ष्यांची तपासणी करीत आहेत. यात प्रामुख्याने ठाण्यातील कोपरी परिसराच्या एक किलोमीटर परिक्षेत्रातून ३६, कल्याण- नडगाव इथून ३५१ तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून ६२१च्या आसपास नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवले आहेत. जिल्ह्यातील सर्व नमुन्यांचे भिवंडी इथे एकत्रीकरण करून ते पुण्याला पाठवले जातात.
काळजी नको, पण सतर्क राहा
ठाणे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त वल्लभ जोशी म्हणाले, की सध्या तरी बर्ड फ्ल्यूने बाधित पक्षी आढळलेले नाहीत. तरी सतर्कता म्हणून जिल्ह्यातून संशयित पक्ष्यांमधून नमुने गोळा करण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी अफवांपासून दूर राहावे आणि काळजी करू नये.
उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका
सध्या उघड्यावर मिळणारे चिकनचे पदार्थ टाळावेत. विशेषतः हातगाड्यांवरील चायनिजही खाऊ नये. तसेच अर्धे कच्चे चिकन खाणे नागरिकांनी टाळायला हवे, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.