उल्हासनगर, ता. १८ (बातमीदार) : रेशनिंग विभागातील अन्नपुरवठ्यात अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू असलेल्या मोठ्या घोटाळ्याला उघडकीस आणण्यासाठी उल्हासनगर विधानसभेचे आमदार कुमार आयलानी यांनी कंबर कसली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली असून, या घोटाळ्याची गुन्हे शाखेमार्फत चौकशी करण्याची लेखी मागणी केली आहे.
शहरात १२ टन धान्य सोमवारी (ता. १७) ट्रकद्वारे सहा दुकानांमध्ये पोहोचवले जाणार होते. तथापि, ट्रकला लावलेले जीपीएस उपकरण काढून ते स्कूटरला लावण्यात आले आणि संबंधित दुकानांमध्ये स्कॅन करण्यात आले. प्रत्यक्षात शिधा उतरवला गेलाच नाही, तर तो काळ्या बाजारात विकला गेला. याप्रकरणी मनोज नावाच्या व्यक्तीने सनी याला पुराव्यासह उल्हासनगर पोलिस ठाण्यातील पोलिसांकडे सुपूर्द केले. मात्र, तेथून आरोपीला सोडून देण्यात आले, असा आरोप आयलानी यांनी निवेदनात केला आहे. यापूर्वीही असाच प्रकार घडला होता आणि आरोपी तोच होता. यासंदर्भात ११ डिसेंबर २०२३ रोजी तारांकित प्रश्नाद्वारे हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करून संबधित विभागाची तक्रार केली होती. शहरातील गरीब आणि गरजू नागरिकांसाठी असलेला शिधा रेशनमाफियांकडून हडपले जात आहे. यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला जात आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात पैशांची देवाण- घेवाण झाल्याचेही आयलानी यांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेमार्फत करून दोषींवर कार्यवाही करावी. तसेच, संबधित ठेकेदाराचा ठेका रद्द करावा, अशी विनंती आमदार आयलानी यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.