नरेश जाधव ः सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. १८ ः तालुक्याचे झपाट्याने नागरीकरण होत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे कचरा व्यवस्थापनाच्या विविध समस्या उद्भवत आहेत. सद्यःस्थितीत तालुक्यातील २२२ गावांपैकी २०४ ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन सुरू आहे, मात्र १८ ठिकाणी जागेअभावी ही योजना रखडली आहे. त्यामुळे रस्त्यालगत साचणाऱ्या कचऱ्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शहापूर तालुक्यातील वासिंद, खातिवली, कळंबे, बोरशेती, आसनगाव, वाफेगोठेघर, कसारा, चेरपोली तसेच खर्डी परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. या ग्रामपंचायतींना कचरा टाकण्यासाठीची व्यवस्थाच नसल्याने राष्ट्रीय महामार्गालगत किंवा इतरत्र टाकावा लागतो. परिणामी, दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याच्या तक्रारी आहेत. तसेच घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठीची जागाच नसल्याने प्रशासनही हतबल आहे. कचरा टाकण्यासाठी जागाच नसल्याने जवळपास १८ ग्रामपंचायतींमध्ये रस्त्यालगतच कचरा टाकला जात आहे. त्यात प्लॅस्टिकसारख्या अविघटित कचऱ्याचे प्रमाण अधिक असल्याने आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
----------------------------------------------------------
जमीन विकत घेणे आवाक्याबाहेर
मुंबई-नाशिक महामार्गाचे बदलले स्वरूप, समृद्धी महामार्गामुळे जमिनींचे वाढलेले भाव यामुळे खासगी जागा विकत घेणे ग्रामपंचायतींच्या आवाक्याबाहेर गेले आहे. शहापूर नगरपंचायतीने कचरा टाकण्यासाठी खासगी जमीन भाड्याने घेतल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज गायकवाड यांनी दिली आहे, पण काही ग्रामपंचायतींपुढे मात्र कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
---------------------------------------------------------------------
विरोधामुळे प्रकल्प बारगळला
घनकचरा व्यवस्थापनासाठी महसूल विभागांतर्गत खातिवली गावालगत असलेल्या गावठाण जागेत घनकचरा प्रोसेसिंग प्लॅट व खतनिर्मिती प्रकल्प राबवण्यासंबंधी चाचपणी केली होती, मात्र परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार असल्याने खातिवली ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनासाठीच्या जागेचा प्रश्न जैसे थे आहे, तर दुसरीकडे जिंदाल कंपनीकडे घनकचरा व्यवस्थापनाचा पूर्ण आराखडा तयार आहे, पण जमीन उपलब्ध होत नसल्याने हा उपक्रम रखडल्याचे शकील शेख यांनी सांगितले.
----------------------------–---------------------–-------
तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीमधील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महसूल तसेच वन विभागाकडे पाठपुरावा करत आहे. शासनाने घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
- पांडुरंग बरोरा, माजी आमदार, शहापूर
-----------------------------------------------------------------
घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये कचरा व्यवस्थापनात अडचणी आहेत. तालुक्यातील २२२ गावांपैकी २०४ ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन सुरू आहे, तर १८ ठिकाणी जागेअभावी ही योजना रखडली आहे.
- नम्रता जगताप, गटविकास अधिकारी, शहापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.