मलंगगडपट्ट्यात पहिल्यांदाच कांदा लागवड
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २५ : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड पट्ट्यात शेतकऱ्यांनी आतापर्यंत भातपिकासह पालेभाज्यांची यशस्वी लागवड केली आहे. यंदाच्या उन्हाळी हंगामात येथील शेतकऱ्यांनी पांढऱ्या कांद्याची लागवड केली आहे. मलंगगड पट्ट्यात असलेल्या चिरड आणि कुंभार्ली गाव परिसरात शेतकऱ्यांनी लाल आणि पांढऱ्या कांद्याची लागवड केली आहे. पहिल्यांदाच झालेल्या या लागवडीत शेतकऱ्यांनी चांगलं यश मिळवले आहे. त्यामुळे यंदा उन्हाळी हंगामात बळीराजाला बरकत देण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
उन्हाळ्यात पाणीटंचाई सगळीकडे जाणवते. मलंगगड पट्ट्यात ओढा- नाल्यांनी तळ गाठला आहे. नद्यांची पाणीपातळीदेखील खालावली आहे. या दिवसांत शेतकऱ्यांना भाजीपीक घेताना तारेवरची कसरत करावी लागते. अनेक शेतकरी एप्रिल-मे महिन्यात पुरेसे पाणी नसल्याने उभी पिके शेतात तशीच सोडून देतात. अशा परिस्थितीतदेखील अंबरनाथ तालुक्यातील बाळाराम काठवले यांसह कुंभार्ली गावातील काही शेतकऱ्यांनी शेतात कांदापिकाची लागवड केली आहे. अंबरनाथ तालुक्यासह ठाणे तालुक्यातील नारिवली गावातदेखील शेतकऱ्यांनी कांदा लागवडीचा प्रयोग केल्याचे समोर आले आहे. वाढता उकाडा आणि त्यात पाणीटंचाई अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी केलेल्या या नावीन्यपूर्ण प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मलंगगड पट्ट्यात उन्हाळी हंगामात फळभाज्यांसह पालेभाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणात होते; मात्र यंदा पहिल्यांदाच गावागावात शेतकऱ्यांनी कांदा लागवड केल्याने कृषी विभागानेदेखील या लागवडीची नोंद घेतली आहे.
उन्हाळी हंगामात कांद्याच्या लागवडीला सहा ते आठ दिवसांनी मातीच्या सुपीकतेप्रमाणे पाणी देणे आवश्यक असते. कांद्याचे पीक काढण्याच्या तीन आठवडे आधी पाणी देणे बंद करतात, त्यामुळे पानातील रस कांद्यात लवकर उतरतो, त्यानंतर कांदा लागवडीसाठी तयार होतो, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे; मात्र पहिल्यांदाच झालेली कांद्याची लागवड शेतकऱ्यांमध्ये चर्चेत आली आहे. यंदाच्या हंगामात मिळणाऱ्या उत्पन्नावर पुढील लागवड अवलंबून असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.