ॲाल कारगो टर्मिनल कंपनीमध्ये युनियनची स्थापना
उरण (वार्ताहर) ः ॲाल कारगो टर्मिनल कंपनीमध्ये सुपरवायझर कामगारांसाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ युनियनची स्थापना करण्यात आली. या युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन कामगार नेते संतोष घरत (राष्ट्रीय उपाध्यक्ष) व गणेश यशवंत पाटील (रायगड जिल्हा अध्यक्ष) यांच्या हस्ते करण्यात केले. या उद्धाटन कार्यक्रमात सर्व सुपरवायझर तसेच कॅान्टीनेंटल कंपनीचे युनिट अध्यक्ष परेश ठाकूर, ट्रान्सइंडीया कंपनीचे युनिट अध्यक्ष रामेश्वर पाटील व विशाल पाटील तसेच इतर कंपन्यांचे कामगार उपस्थित होते.
.................
रोजगार मेळाव्याला बेरोजगारांचा प्रतिसाद
उरण (वार्ताहर) ः लायन्स क्लब ऑफ पनवेल, द्रोणागिरी, उरण आणि यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स यांच्या संयुक्त विद्यमाने पिरकोन येथील रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला बेरोजगार युवकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. उरण तालुक्यात त्यातही ग्रामीण भागात पहिल्यांदाच बेरोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी २३३ उमेदवारांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी ८२ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यापैकी शिक्षण, अनुभव, कौशल्य बघून एकूण ३० जणांची नोकरीसाठी निवड करण्यात आली. ग्रामीण भागात अनेक युवक बेरोजगार आहेत. अनेकांनी उत्तम शिक्षण पूर्ण केले असून त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार नोकरी मिळत नसल्याने नैराश्य आले आहे. त्यामुळे या युवकांच्या नोकरीची गरज ओळखून अनेक सामाजिक संघटनांनी पुढे येत संबंधित रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मध्ये विविध विद्यार्थ्यांनी ऑनलाईन लिंकद्वारे नाव नोंदणी केली होती. जे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात रोजगार मेळाव्यात सहभागी झाले होते. त्यांना विविध नामांकित कंपन्यांनी सहभागी करून घेतले.
....................
आश्वासन मिळाल्याने दिव्यांग बांधवांचे धरणे आंदोलन स्थगित
उरण (वार्ताहर) ः बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीतील द्रोणागिरी नोडमध्ये साफसफाई कामगार भरतीमध्ये दिव्यांगाना प्राधान्य मिळावे, तसेच गावातील कमिटीमध्ये किमान एक दिव्यांग बांधवाचा समावेश करून घ्यावा. या प्रमुख मागणीसाठी गावातील दिव्यांग बांधव हे मंगळवार २५ मार्च रोजी बोकडविरा ग्रामपंचायत येथे धरणे आंदोलनाला बसणार होते. मात्र आंदोलन करण्यापूर्वीच बोकडविरा ग्रामपंचायतीच्या सरपंच अपर्णा पाटील, उपसरपंच ध्रुव पाटील, ग्रामसेवक घाडगे, कॉम्रेड भूषण पाटील, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र म्हात्रे यांच्यात तातडीची बैठक घेण्यात आली होती. यामध्ये दिव्यांग बांधवाचे प्रतिनिधी म्हणून दिव्यांग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र म्हात्रे (बोकडवीरा) यांनी नेतृत्व केले. या बैठकीत दिव्यांग बांधवांच्या महत्वाच्या मागण्यावर सकारात्मक चर्चा करत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्यांनी दिव्यांग बांधवाना त्यांचे मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. आश्वासन मिळाल्याने दिव्यांग बांधवांनी समाधान व्यक्त करत जाहीर केलेले आमरण उपोषण स्थगित केले.
.........
बागेश्री सोसायटीमधील समस्या संदर्भात ठाकूर यांचे आश्वासन
खारघर (बातमीदार) : खारघरमधील सिडकोच्या बागेश्री गृहनिर्माण सोसायटीच्या समस्या संदर्भात एप्रिल महिन्यात सिडकोच्या व्यस्थापकीय संचालक समवेत बैठक घेऊन समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाईल, असे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोसायटीच्या सदस्यांना दिले. या बैठकीला माजी नगरसेवक हरेश केणी, अजीज पटेल, भाजपच्या महिला अध्यक्षा साधना पवार, खारघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण भगत आदी उपस्थित होते. खारघर सेक्टर ४० मधील सिडकोच्या बागेश्री गृहनिर्माण सोसायटीत सदनिका असून अनेक घरांना गळती लागली आहे. सोसायटीमधील उद्यानाची दुरवस्था, प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर केली जाणारी अनधिकृत पार्किंग, अनेक वेळा कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा, रस्त्याची दुरवस्था तसेच काही दिवसांपूर्वी सोसायटी बाहेरील तरुणांनी केलेली मारहाण आणि पालिकेकडून आकारल्या जाणाऱ्या मालमता कर आदी समस्या भेडसावत असल्याने नुकतेच सोसायटीच्या सदस्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत बैठक आयोजित केली होती. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशन समाप्त होताच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक समवेत बैठक आयोजित करून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदारांना निवेदन दिले.
..........
वीर जवान फाउंडेशनचा शाहिद जवानांसाठी कार्यक्रम
नवी मुंबई : शहीद दिवसाचे औचित्य साधून वीर जवान फाउंडेशनच्या वतीने षन्मुखानंद हॉल, सायन येथे एक शाम वीर जवानों के नाम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक विजय नाहटा यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष सुरेश काकडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध सिने पार्श्वगायक सुदेश भोसले यांच्या हिट्स ऑफ सुदेश भोसले यांच्या सदाबहार हिंदी- मराठी गाण्यांचा ऑर्केट्रा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला कमांडर सोलंकी, कमांडो मेजर इंद्रजीत, वीर जवान फाउंडेशनचे संस्थापक निवृत्त सनदी अधिकारी विजय नाहटा व वीर जवान फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेश काकडे तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात देशभक्ती गीताने करण्यात आली. तसेच पार्श्वगायक सुरेश भोसले आणि बेला सुलाखेने आपल्या कलेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकून घेतली. विर जवान फाउंडेश या संस्थेच्या माध्यमातून वीर जवान शहीदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने एक शाम जवानोंके नाम या कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन करण्यात येत असते.
..................
पी. टी. उषा यांच्या हस्ते नॅशनल मेरीटाइम गेम्सचे उद्घाटन
नेरूळ (बातमीदार) ः ''नॅशनल मेरीटाईम गेम्स २०२५'' चा शुभारंभ नुकताच आयएमइ पामबीच रोड टी. एस. चाणक्य येथे झाले. या उद्घाटन समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आणि खासदार डॉ. पी. टी. उषा यांच्या हस्ते वृक्षारोपण, ध्वजारोहण करून या क्रीडा महोत्सवाचा आरंभ झाला. नॅशनल मेरीटाइम गेम्स हे डायरेक्टॉरेट जनरल ऑफ शिपिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोर्ट अथॉरिटी यांच्या सहकार्याने आयोजित केले आहे. या स्पर्धांमध्ये ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, कॅरम, क्रिकेट, बुद्धिबळ, गोल्फ, फूटसल, पिकल बॉल, इंडोर रोइंग, जलतरण, टेबल टेनिस यांच्यासारख्या २० पेक्षा अधिक खेळांचा समावेश आहे. या खेळासाठी डीजी शिपिंग, पीएसए मुंबई पोर्ट ट्रस्ट, शिपिंग कॉपरेशन ऑफ इंडिया, मेरी टाईम ट्रेनिंग ट्रस्ट आणि जेएनपीए यांच्यासारख्या अनेक प्रतिष्ठित कंपन्यांचे पाठबळ असल्याने क्रीडा स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे यावेळी सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.