उरण, ता. २५ (वार्ताहर) : केंद्र सरकारने नुकताच मंजुरी दिलेल्या पागोटे ते चौक या नव्या महामार्गाचा सर्व्हे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी पिटाळून लावले. या रस्त्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता एका खासगी कंपनीला वाचविण्यासाठी या रस्त्याचा आराखडा बदलून तब्बल ३०० मीटर वळसा घालून हा रस्ता बनविण्याचा घाट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण घालत असल्यामुळे शेतकऱ्यांनी या मोजणीला विरोध केला आहे.
केंद्र सरकारच्या वतीन जेएनपीए बंदरापासून पागोटे ते चौक या २९.२१९ किलोमीटरदरम्यान सहा पदरी ग्रीनफिल्ड द्रुतगती राष्ट्रीय महामार्ग तयार केला जात आहे. हा प्रकल्प ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर विकसित केला जाणार असून, त्यासाठी एकूण चार हजार ५०० कोटी रुपये खर्च होणार आहेत. जेएनपीए बंदरातील कंटेनरचे वाढते प्रमाण आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास या गोष्टी लक्षात घेऊन हा राष्ट्रीय महामार्ग निर्माण केला जात आहे. हा महामार्ग जेएनपीए बंदर पागोटेपासून सुरू होऊन मुंबई-पुणे मार्गावर चौकपर्यंत संपणार आहे. हा मार्ग मुंबई-गोवा महामार्गाला आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गालाही जोडला जाणार आहे. यामध्ये उरण तालुक्यातील बोरखार, जुई, कळंबुसरे, चिरनेर या गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. नवीन महामार्ग बांधताना शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
-------------------
उद्योजकाची जमीन वाचवण्याचा घाट
शेतकऱ्यांना जमिनीचा किती व कसा मोबदला देणार, बाधित शेतकऱ्यांना प्रकल्पात रोजगार अथवा नोकरीच्या संधी मिळणार का, गावामध्ये जाण्या-येण्यासाठी अंडर पासेस किंवा इंटरचेंज कुठे ठेवणार अशा प्रश्नांची उत्तरे शेतकऱ्यांना न देता आणि एका खासगी उद्योजकाची जमीन वाचविण्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त करणाऱ्या या ग्रीन फिल्ड मार्गाला कळंबुसरे व चिरनेरच्या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी मोजणी करण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना हुसकावून लावले. या वेळी मोठ्या संख्येने चिरनेर, कळंबुसरे, जुईचे शेतकरी उपस्थित होते.
----------------
शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध नाही; परंतु आम्हाला विश्वासात न घेता या महामार्गाच्या मोजणीचा घाट घातला आहे. महामार्ग प्राधिकरणाने पहिला काढलेला लेआउट सरळ होता; मात्र प्राधिकरणाने आता जो लेआउट तयार केला आहे त्यात जवळपास ३०० मीटरचे अंतर वाढत आहे. यामध्ये अनेक शेतकरी बाधित होत आहेत. एका कंपनीला वाचवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचा डाव हे अधिकारी करीत आहेत.
- विक्रांत पाटील, बाधित शेतकरी, कळंबुसरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.