कोरोना काळातील साहित्य धूळखात
यंत्रसामग्रीकडे दुर्लक्ष; बदलापूरकरांच्या पैशांचा चुराडा
बदलापूर, ता. २५ (बातमीदार) ः कोरोनाच्या महामारीला नुकतीच पाच वर्षे पूर्ण झाली; मात्र बदलापूर पश्चिमेच्या बॅरेज रोड येथील पालिकेच्या कोंडीलकर इमारतीत कोरोना काळातील कोट्यवधीचे साहित्य अक्षरशः धूळखात पडलेले आहे. कोरोना काळात वापरात न आलेल्या खाटा, गाद्या, वैद्यकीय वापरातील लोखंडी स्टँड, मास्क, नवे कोरे व्हेंटिलेटर मशीन आदी साहित्य पडून आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोरोनावेळी अनेक वस्तू न मिळाल्याने बदलापूरकरांनी आपला जीवदेखील गमावला होता.
सन २०२० मध्ये आलेल्या कोरोना महामारीने जगभरात लाखो लोकांचे जीव घेतले. मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढल्याने अनेकांना औषधोपचारही मिळाले नाहीत. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेडअभावी अनेकांनी आपले जीव गमावले; मात्र कुळगाव-बदलापूर नगरपालिका मालकीच्या कोंडीलकर इमारतीत कोरोना काळातील वापरात न आलेली कोट्यवधी रुपयांची औषधे, ऑक्सिजन सिलेंडर तसेच वैद्यकीय साहित्य धूळखात पडलेले आहे. या ठिकाणच्या वस्तू पाहिल्यास कोट्यवधींच्या मालमत्तेचा चुराडा झाल्याचे दिसते. नव्या कोऱ्या खाटा, गाद्या, बेडशीट, रेमडेसिव्हिर इंजेक्शन, इतर औषधे, नव्या कोऱ्या असलेले व्हेंटिलेटर, ऑक्सिजन मशीन, ऑक्सिजन सिलिंडर कोरोना महामारी संपल्यानंतर तीन ते चार वर्षांपासून तसेच पडून आहेत. विशेष म्हणजे, यातील अनेक मशीन्सचा वापरच न झाल्याने बदलापूरकरांच्या कररूपी पैशांचा चुराडा झाला आहे.
----
योग्य वापर झाला असता तर...
कोरोना काळात यातील अनेक वस्तू वेळेत उपलब्ध न झाल्याने बदलापूरकरांनी आपले प्राणदेखील गमावले आहेत. आता कोरोना संपूनही वापरात न आलेले साहित्य चांगल्या अवस्थेत आहे. या साहित्याचा त्यावेळी योग्य वापर झाला असता तर अनेक रुग्णांना जीवदान मिळाले असते. या सगळ्यात चूक कोणाची, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
----
वरिष्ठांना सुपूर्द करणार!
पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता, शिल्लक असलेल्या साहित्याबाबत आम्ही वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार केला होता; मात्र संबंधित विभागाकडून काहीच उत्तर न आल्याने अखेर आता यातील वापरात येणारे सामान आम्ही जिल्हा शल्यचिकित्सकांशी पत्रव्यवहार करून त्यांच्या सुपूर्द करण्याचे ठरवले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.