जीवघेणी रिक्षा वाहतूक
शालेय विद्यार्थ्यांचाही जीव टांगणीला
राजीव डाके : सकाळ वृत्त सेवा
ठाणे ता. २७ : एकीकडे रिक्षातील सीएनजी बाटला चुकीच्या पद्धतीने हाताळून प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. त्यातच आता रिक्षात क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करून त्यांचा जीव धोक्यात टाकला जात आहे. संतापजनक बाब ही आहे की हा प्रकार वाहतूक पोलिस, प्रादेशिक परिवहन आणि स्थानिक पोलिसांसमोर होत आहे. प्रवासीदेखील स्वतःच्या जीवाची पर्वा न करता असा जीवघेणा प्रवास करत आहेत. तसेच चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवाचीही काळजी घेतली जात नाही. ठाणे, कळवा, मुंब्रा येथे बहुतांश शालेय विद्यार्थ्यांची रिक्षामधून धोकादायक प्रकारे वाहतूक केली जाते. एका रिक्षात १० ते १२ विद्यार्थ्यांना बसवले जाते.
प्रवाशांना किफायतशीर ठरेल आणि रिक्षाचालकांनाही वाढीव भाडे मिळेल, या हेतूने शहरातील काही महत्त्वाच्या भागात प्रादेशिक परिवहन विभागाने शेअरिंग रिक्षा वाहतुकीला परवानगी दिली आहे. ठाणे स्थानक, गावदेवी मैदान अशा मुख्य ठिकाणाहून शहरात सुमारे ३० हून अधिक ठिकाणी शेअरिंग पद्धतीने रिक्षा प्रवास सुरू आहे, तर बहुतांश ठिकाणी अनधिकृतपणे शेअरिंग वाहतूक केली जात आहे; मात्र वाहतूक पोलिस, स्थानिक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाला न जुमानता काही रिक्षाचालक जादा भाडे मिळवण्याच्या हव्यासापोटी प्रवाशांच्या जीविताशी खेळत आहेत. अशी वाहतूक करणारे बहुतांश रिक्षाचालक प्रवाशांसोबत गैरवर्तनदेखील करत असल्याच्या घटना घडत आहेत.
अनेक रिक्षाचालकांच्या तोंडात पान, गुटखा, सिगारेट असते. त्यांनी धूम्रपानासह मद्यपानही केलेले असते. महिला प्रवाशांसोबत अरेरावीची भाषा करतात. एकेका रिक्षात पाच-पाच, सहा-सहा प्रवासी बसवतात. दुसऱ्या वाहनांना ओव्हरटेक करून, कट मारून वेगाने रिक्षा चालवतात. प्रवाशांना कामावर जाण्याची-घरी येण्याची घाई असल्याने त्यांना रिक्षाचालकांची दादागिरी सहन करावी लागते. माजिवडा नाका, तीन हात नाका, नितीन कंपनी नाका, कॅटबरी नाका, कळवा ब्रिज नाका, सिडको बस आगार आदींसारख्या पोलिस बंदोबस्त असलेल्या ठिकाणाहून अशी वाहतूक होते.
अबोलीतूनही पाच-पाच जणांचा प्रवास
अबोली रिक्षा महिलाचालकांकडूनसुद्धा आणि नि:संकोचपणे पाच-पाच प्रवाशांची वाहतूक केली जाते. यातील चार प्रवासी मागे आणि एक प्रवासी पुढे चालकाच्या बाजूला बसवला जातो.
एकमेकांना संदेश देण्याची कला
क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करताना रिक्षाचालक एकमेकांच्या संपर्कात असतात. कुठे कारवाई सुरू आहे, कुठे प्रादेशिक परिवहन वाहतूक पोलिस कारवाई कारण्यासाठी उभे आहेत, अशी सगळी माहिती एकमेकांना वाहतूक करता करता देतात. मग त्याआधारे हे रिक्षाचालक अशी ठिकाणे टाळून पुढे जातात.
रिक्षा तपासणीसाठी महिनाभर काम करणारे तीन अधिकाऱ्यांचे एक स्कॅाड तैनात आहे. आलेल्या तक्रारी किंवा तपासणीसाठी हे स्कॅाड फिरत असते. वाहन परवाना शर्तीचा भंग करताना कोणी आढळून आल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते.
- रोहित काटकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे
ठाण्यातील रिक्षा शेअरिंग मार्ग :
- गावदेवी मैदान ते न्यू पासपोर्ट कार्यालय, आशर आयटी पार्क, विवियाना मॉल, लोकमान्य नगर, यशोधन नगर, कामगार रुग्णालय, शिवाई नगर, वर्तक नगर, इंदिरानगर, किसन नगर, तीन हात नाका, वसंत विहार, आय थीन लोढा.
- स्थानक ते माजिवडा, कापूरबावडी, कॅशल मिल, गांधीनगर.
- तीन हात नाका ते घोडबंदर, माजिवडा
- नितीन कंपनी ते माजीवडा
- कॅडबरी ते माजिवडा
- सिडको ते काल्हेर
- कापूरबावडी ते कशेळी, मानकोली, कोलशेत, काल्हेर, भिवंडी
- नितीन कंपनी ते इंदिरानगर
- कळवा स्थानक आणि मुंब्रा स्थानक येथूनही अशाच प्रकारची जीवघेणा शेअरिंग वाहतूक होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.