भगदाड गँगच्या दोन चोरट्यांना कर्नाटकातून अटक
वज्रेश्वरी, ता. २८ (बातमीदार) : गोदामाच्या भिंतीला भगदाड पाडून लाखो रुपयांचे लॅपटॉप लंपास करणाऱ्या कर्नाटकमधील ‘भगदाड गँग’ला भिवंडी पोलिसांनी शिताफीने बेड्या ठोकल्या. या दोन चोरट्यांकडून २४ लाखांच्या २६ लॅपटॉपसह गुन्ह्यात वापरलेले वाहनही जप्त केल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक धनराज केदार यांनी दिली आहे.
दिलीप बसवराज चव्हाण (वय २०), अर्जुन मुन्नु राठोड (वय २३) अशी आरोपींची नावे असून, या गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी नारपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गोदामाच्या भिंतीला भगदाड पाडून गोदामामधून २६ लॅपटॉप चोरी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणावरून या गुन्ह्यातील आरोपींची ओळख पटविण्यात आली. पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला असता आरोपी हे कर्नाटकातील कन्याकोळ तांडा जिल्हा यादगिर येथे लपून बसले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे भिवंडी युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक धनराज केदार, सुधाकर चौधरी यांच्या पथकाने कर्नाटकातील आरोपींच्या ठिकाणी सापळा रचून अटक केली. आरोपींची चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी या प्रकरणातील २६ लॅपटॉप व गुन्ह्यांत वापरलेले वाहन, असा एकूण २४ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.