डोंबिवलीत सातवर्षीय मुलाचे अपहरण
शाळेत सोडणाऱ्या रिक्षावाल्याचे कृत्य; अवघ्या साडेतीन तासांत आरोपी गजाआड
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २८ : शाळेत सोडणाऱ्या रिक्षावाल्यानेच बांधकाम व्यावसायिकाच्या सातवर्षीय मुलाचे अपहरण केल्याची घटना शहरात घडली. अपहरणकर्त्यांनी मुलाच्या वडिलांकडे दोन कोटींची खंडणी मागितल्यावर हा प्रकार उघडकीस आला. पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांना याची माहिती मिळताच मानपाडा व इतर पोलिस ठाण्यातील पाच पथकांनी या मुलाचा शोध सुरू केला. त्यानंतर अवघ्या साडेतीन तासांत शहापूर येथून मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली.
या प्रकरणात रिक्षावर चालकाचा भाऊ आल्याने पोलिसांचा संशय बळावला, तपासाची चक्रे त्या दिशेने फिरवत पोलिसांनी चौघांना अटक केली. यात दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश असून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त केली आहे. रिक्षाचालक वीरेन पाटील (वय २५) आणि त्याच्या साथीदारांसह अन्य दोन अल्पवयीन आरोपींना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिजन्सी अनंतम येथे राहणारे महेश भोईर यांचा सातवर्षीय मुलगा कैवल्य याचे शुक्रवारी (ता. २८) सकाळी अपहरण करण्यात आले. फिर्यादीत दिलेल्या तक्रारीनुसार सकाळी साडेनऊ वाजता महेश यांना आरोपींनी फोन करून दोन कोटींची खंडणी मागितली; पैसे न दिल्यास तसेच पोलिसांना कळविल्यास मुलास जीवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी तत्काळ गुन्ह्याची नोंद करत गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदारांची पाच वेगवेगळी तपास पथके तयार केली. महेश यांच्या पत्नी कोमल यांच्या जबाबावरून सकाळी कैवल्य याला शाळेत घेऊन जाणारे रिक्षाचालक वीरेन पाटील यांच्याऐवजी त्याचा भाऊ आला होता; यावरून पोलिसांना वीरेन याच्यावर संशय आला. त्याअनुषंगाने पोलिसांनी वीरेन याच्या भावाला ताब्यात घेत चौकशी केली. तसेच तांत्रिक माहिती प्राप्त करत वीरेन पाटील आणि रिक्षाचा माग काढून अवघ्या साडेतीन तासांत अपहृत मुलाची शहापूर येथून शहापूर पोलिसांच्या मदतीने सुखरूप सुटका केली.
..
इतर आरोपींचा शोध
अपहृत मुलास त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात सहा जणांना ताब्यात घेतले असून इतर दोघांचा शोध घेण्यात येत आहे. यात दोन अल्पवयीन आरोपी आहेत. आरोपींनी यापूर्वी कैवल्य याचे दोनदा अपहरण करण्याचा प्रयत्न केला; मात्र तो यशस्वी झाला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. पैशांसाठी आरोपींनी हे अपहरण केल्याची प्राथमिक माहिती असून संपूर्ण अंगाने तपास सुरू आहे. यामागे अजून काही कारण आहे का, याचाही शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिस उपायुक्त झेंडे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.