बदलापूर, ता. ३० (बातमीदार) : शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेंतर्गत कुळगाव बदलापूर नगरपालिकेने कागदी प्रणाली बंद करून त्याला नवा पर्याय म्हणून ‘ई ऑफिस’ हा नवा डिजिटल मार्ग अवलंबला आहे. या नव्या उपक्रमामुळे नगरपालिका अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि संपूर्ण डिजिटल बनणार आहे. या आधुनिक तंत्रज्ञान प्रणालीचा वापर सुरू झाल्यानंतर याचा फायदा बदलापुरातील नागरिकांना आणि प्रशासनालाही होईल, असा आशावाद पालिकेने व्यक्त केला आहे.
शासकीय कामकाजात सुधारणा आणण्यासाठी; तसेच नागरिकांना अधिक प्रभावी आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी, कुळगाव बदलापूर नगरपालिकेने ‘ई ऑफिस’ ही संकल्पना अवलंबली आहे. त्यामुळे कार्यालयीन प्रक्रियांमध्ये गती येणार असून, कागदी कामकाजावर अवलंबून राहण्याची गरज उरणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले. या नवीन प्रक्रियेमुळे कार्यालयातील विविध विभागांमधील दस्तऐवज आणि माहिती ऑनलाइन व्यवस्थापित करण्यात येत आहे. यामुळे दस्तऐवज गहाळ होणे, उपलब्ध नसणे, अधिकारी कर्मचारी जागेवर नसताना फाईल न सापडणे, ठेकेदार किंवा अधिकारी, कर्मचारी यांच्या बदलीनंतर फाईल शोधण्यास विलंब लागणे, अशा सर्व समस्यांवर उपाय म्हणून ‘ई ऑफिस’ संगणक प्रणाली वापरात आणण्याचा निर्णय घेऊन कार्यालयीन कामात हा बदल घडवून आणल्याचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी सांगितले.
या संकल्पनेच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर काम पूर्ण झाले आहे. मुख्याधिकाऱ्यांनी प्रशासनाचे सर्वच कामकाज ‘ई ऑफिस’द्वारे करणे सक्तीचे केले आहेत. यासाठी कर्मचाऱ्यांचे शासकीय मेल आयडी कार्यान्वित करून, प्रत्येकाचे स्वतंत्र अकाउंट तयार करणे, ‘ई ऑफिस’ वापराबाबत प्रशिक्षण देणे, अशा सर्व बाबी पूर्ण केल्या आहेत. या संपूर्ण आधुनिक प्रणालीमुळे प्रत्येक विभागातील कामकाजाच्या फाईल, या मुख्याधिकाऱ्यांपर्यंत एका क्लिकवर पोहोचू शकणार आहेत.
कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाचा हा उपक्रम आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. डिजिटल आणि प्रगत तंत्रज्ञानाचे वापर करून चांगल्या कार्यक्षमतेने सेवा देण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न आहे. त्याचा फायदा नागरिकांना आणि प्रशासनाला होईल. त्याचबरोबर पालिकेतील अधिकारी आणि कर्मचारीही डिजिटल होतील. कमी वेळात अधिकाधिक सेवा या माध्यमातून देता येऊ शकेल.
- मारुती गायकवाड, मुख्याधिकारी, कुळगाव बदलापूर नगरपालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.