ढोल-ताशांच्या गजरात नववर्षाचे स्वागत
उत्साहाची गुढी उभारून जल्लोष
अलिबाग, ता. ३० (वार्ताहर)ः जिल्ह्यात ठिकठिकाणी शोभायात्रांच्या माध्यमातून नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजराने संपूर्ण आसमंत दणाणून निघाला होता. पारंपरिक वेशभूषा करून उत्साहाची गुढी उभारत मराठी नववर्षाचा जल्लोष साजरा करण्यात आला. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी सोने-चांदी, वाहन खरेदीसह अन्य नवीन कामांना सुरुवात करण्याचा संकल्प अनेकांनी केला.
अलिबाग शहरात रविवारी सकाळी आठच्या सुमारास ढोल-ताशांच्या गजरात शोभायात्रेला सुरुवात झाली. रस्त्यांवर फुलांच्या, रंगीबेरंगी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. याबरोबरच प्रमुख चौकात मराठी नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने गुढी उभारण्यात आली होती. शोभायात्रांमध्ये तरुणाईसह आणि महिलांचा प्रचंड उत्साह पाहण्यास मिळाला. मराठमोळ्या पेहरावातील आबालवृद्ध आणि त्याचबरोबर महिलांचे ढोलपथक, ध्वजपथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शहरातील ब्राह्मण आळीमधील श्रीराम मंदिराच्या प्रांगणात गुढीची विधिवत पूजा केल्यावर नववर्ष स्वागत यात्रेस उत्साहात सुरुवात झाली. शहरातील विविध गणेश मंडळे, नवरात्र मंडळे, विविध संस्था, ज्ञाती मंडळे आणि युवा मंडळे तसेच क्रीडा मंडळांसह सर्वपक्षीय राजकीय नेतेमंडळी यात्रेत सहभागी झाले होते.
राममंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शेतकरी भवन, ठिक्कळ नाका, शिवलकर नाका, बाजारपेठमार्गे ही स्वागत यात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर काशी वीश्वेश्वर मंदिराजवळ आल्यावर सांगता झाली. ऐतिहासिक पेहरावातील घोडेस्वार, घोडागाड्या, मल्लखांब पथके आणि तालुक्यांतील विविध बॅन्ड पथक यांचा सहभाग, हे यंदाच्या नववर्ष यात्रेचे वैशिष्ट्य होते.
यात्रेस प्रोत्साहन देण्यासाठी अलिबाग-मुरूड विधानसभेचे आमदार महेंद्र दळवी, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, माजी गटनेते प्रदीप नाईक, अनिल चोपडा, वृषाली ठोसर, संजना किर, ॲड. अंकित बंगेरा, दीपक रानवडेंसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लाखोंची उलाढाल
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या चैत्रपाडव्यानिमित्त अलिबाग शहरातील ज्वेलर्समध्ये दागिने खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती. सोन्याचा दर गगनाला भिडला असला तरी सोने खरेदीची हौस आजही कायम आहे. सोने खरेदीबरोबरच अलिबाग शहरात नवनवीन दुकाने, गाळे, कार्यालये यांची उद्घाटने करण्यात आली आहेत, तर काहींनी वाहन व फ्लॅट खरेदीकडे आपला मोर्चा वळविला होता.
...............
घरोघरी उभारली आनंदाची गुढी
खोपोली, ता. ३० (बातमीदार) ः चैत्रपाडवा, हिंदू नववर्षानिमित्त खोपोलीत मोठ्या संख्येने सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी घरोघरी आनंदाची गुढी उभारून गुढीपाडवा उत्साहात साजरा केला. विविध मंडळे, सामाजिक संस्थांकडून गुढीपाडवा व नववर्षाच्या निमित्त सार्वजनिक महापूजा, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. व्यापारीवर्ग, बांधकाम व्यावसायिक, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक, कपड्याचे व्यावसायिक व दुकानदारांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विशेष सवलत जाहीर केल्या होत्या.
खोपोली : घरोघरी गुढी उभारून उत्सव साजरा करण्यात आला.
...............
रामनवमीपर्यंत घराघरांवर गुढी
पोयनाड (बातमीदार) : प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव हा चैत्र शुद्ध नवमी या तिथीला साजरा केला जातो. रामाचे नवरात्र रविवार गुढीपाडव्यापासून सुरू होत आहेत. या सोहळ्यानिमित्त रामनवमीपर्यंत (ता. ६) पोयनाड परिसरात विविध गावांत कीर्तन, प्रवचन, हरिपाठ असे कार्यक्रम होणार आहेत. कीर्तनकारांकडून रामायण व श्रीराम जन्मकथेचे आख्यान सांगितले जाणार असून, पोयनाडजवळील कमळपाडा येथे घराघरांत रामनवमीपर्यंत गुढी उभारली जाणार आहे. रामनवमी सप्ताह पोयनाड, कुर्डूस, कमळपाडा, शहापूर, धामणपाडा, हाशिवरे, काचळी या गावांमध्ये संपन्न होणार आहे.
...................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.