सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : रांगोळींनी सजलेले रस्ते, पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा निनाद, लेझीमच्या तालावर ठेका अशा थाटात निघणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेत विविध संस्कृतीचे दर्शन घडविणारा महाकुंभ यंदाच्या स्वागत यात्रेत दिसून आला. शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, प्रशासकीय विभागातील संस्थांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित चित्ररथ सादर केले होते. या वेळी पारंपरिक पोशाख परिधान करून मोठ्या संख्येने महिला या यात्रेत सहभागी झाल्या होत्या.
ठाणे शहरात हिंदू नवीन वर्ष मोठ्या दिमाखात साजरे केले जाते. तसेच यंदाच्या वर्षी श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत यात्रा काढण्यात आली होती. सकाळी सात वाजता या यात्रेला श्री कौपिनेश्वर मंदिरापासून सुरुवात झाली. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, स्वागताध्यक्ष शरद गांगल, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी, संजीव ब्रह्मे, डॉ. अश्विनी बापट आदी उपस्थित होते. या स्वागत यात्रेत ठाणे शहरातील ६० हून अधिक संस्था, तर ७० चित्ररथ या यात्रेत सहभागी झाले होते.
पारंपरिक वेषभूषा परिधान करून काही महिला बाइक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या दिसून आल्या. तर, मुख्य चौकात काही सामाजिक संस्थांकडून पालखी आणि रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली होती. तसेच काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थांच्या माध्यमातून मंच उभारले होते. तसेच यंदा राजस्थानी, कर्नाटकी, शीख, पारसी, जैन अशा विविध प्रांतातील ठाणेकर नागरिकदेखील त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत यंदाच्या यात्रेत सहभागी झालेले दिसून आले. तर, छत्रपती शिवाजी महाराज, राधा-कृष्ण, विठ्ठल, छत्रपती संभाजी महाराज यांच्या वेशभूषेमध्ये लहान मुले दिसून आली.
चित्ररथातून जागृती
समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीने ‘गुड अँड बॅड टच’चे महत्त्व लहान मुलांना पटवून देणारा चित्ररथ साकारण्यात आला होता. मनःशक्ती केंद्राच्या वतीने मुलांना परीक्षेची भीती का वाटते, यांसारखे विविध प्रश्न चित्ररथाच्या माध्यमातून मांडले होते. टीजेएसबी बँकेच्या वतीने साकारण्यात आलेल्या बाराखडी आणि मुळाक्षरांचा अर्थशास्त्राशी असलेला संबंध दाखविणारा चित्ररथ स्वागत यात्रेतील नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता. तसेच, घंटाळी मित्र मंडळाच्या वतीने साकारण्यात आलेल्या चित्ररथात योगाचे महत्त्व सांगण्यात आले होते.
जिल्हा परिषदेचा पहिल्यांदाच रथ
ठाणे महापालिकेच्या शिक्षण, आरोग्य, घनकचरा तसेच पाणीपुरवठा विभागाचे चित्ररथ याठिकाणी पाहायला मिळाले. घनकचरा विभागाच्या चित्ररथात ठाणे शहर स्वच्छ ठेवण्यासंदर्भात जनजागृती करणारे गीत सादर केले जात होते. विविध योजनांची माहिती देणारा जिल्हा परिषदेचा चित्ररथ यंदा पहिल्यांदाच या यात्रेत सहभागी झाला होता.
सुरक्षेसाठी स्वयंसेवकांचे कडे
यात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी काही संस्थांच्या वतीने अनेक ठिकाणी पाण्याची, तसेच थंडपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. तर, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्वागत यात्रेच्या मार्गावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चौकाचौकात स्वयंसेवकांचे तट उभे केल्याचे दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.