उल्हासनगर, ता. १० (वार्ताहर) : उल्हासनगरमध्ये एका विकृत ५० वर्षीय शेजाऱ्याने चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केला होता. त्यानंतर त्याने स्वतः निर्दोष असल्याचा बनाव करत पोलिसांना ११२ मदतवाहिनीवर संपर्क साधून मुलीच्या पालकांविरोधात खोटी तक्रार दिली. मात्र, पोलिसांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत सत्य उघड करत सोमवारी (ता. ७) नराधमाला अखेर अटक झाली.
पोलिसांची मदतवाहिनी नंबर ११२ ही सेवा नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुरू करण्यात आली आहे. पण, उल्हासनगरमध्ये एका विकृत व्यक्तीने तीच सेवा आपल्या घृणास्पद गुन्ह्याचे सत्य लपवण्यासाठी वापरली. विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ५० वर्षीय इंजिनिअर आरोपीने आपल्या शेजारी राहणाऱ्या अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करत ११२ नंबरवर कॉल करून तिच्याच पालकांविरोधात खोटी तक्रार दिली. मुलगी घरच्यांकडून त्रासली आहे. मला तिला दत्तक घ्यायचं आहे, असे भासवत त्याने पोलिसांसमोर सहानुभूतीचे वेगळेच चित्र उभे करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांना या प्रकरणाचा संशय आल्याने त्यांनी या घटनेची माहिती पोलिस उपायुक्त सचिन गोरे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पडवळ यांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पालकांची विचारपूस केली असता, त्यांना ही तक्रार ऐकून धक्काच बसला. त्यानंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी आणि पीडित मुलीच्या घरच्यांनी आपल्या मुलीला विश्वासात घेत तिच्याशी संवाद साधला. त्यानंतर मुलीने जे सांगितले ते काळजाचा थरकाप उडवणारे होते. त्या चिमुकलीने तिच्यावर अत्याचार करणारा तोच व्यक्ती आहे, जो तिला दत्तक घ्यायची भाषा करत होता. याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी (ता. ७) तत्काळ आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर पॉक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
सामाजिक जागरूकतेची गरज
घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. शेजारी, ओळखीचे आणि सुशिक्षित लोक यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हाच प्रश्न पालकांपुढे उभा राहिला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तत्काळ कारवाई केल्याने समाजातून त्यांचे कौतुक होत आहे; परंतु अशा प्रकारांवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी कठोर शिक्षा आणि सामाजिक जागरूकता गरजेची असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केले जात आहे. दरम्यान, पोलिसांची तत्परता आणि पालकांची जागरूकतेमुळे या घटनेचे सत्य बाहेर आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.