रायगडात दोन ठिकाणी चक्रीवादळ निवारा केंद्र
अलिबागच्या आवासमध्ये जागेअभावी केंद्र रद्द
सायली रावले ः सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १० ः रायगड जिल्ह्याला काही वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मनुष्यहानी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीलगत तालुक्यांमध्ये चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठीच राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत जिल्ह्यासाठी तीन निवारा केंद्रे उभारण्यात येणार होती. त्यापैकी अलिबाग तालुक्यात आवास येथे योग्य जागा न मिळाल्याने तेथील केंद्र रद्द करण्यात आले आहे. श्रीवर्धन तालुक्यात दिघी आणि बोर्ली येथे निवारा केंद्र बांधण्यात आले आहे.
चक्रीवादळ, अतिवृष्टी अशा प्रकारची आपत्ती उद्भवून मनुष्यहानी होऊ नये, म्हणून तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागासोबत झालेल्या बैठकीत चार वर्षांपूर्वी तत्कालीन रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी शासनास सविस्तर प्रस्ताव सादर केला व तो प्रस्ताव राज्य शासनाकडून प्रकल्प व्यवस्थापक, राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली यांना अंतिम मंजुरीकरिता पाठविण्यात आला होता.
काही वर्षांत रायगड जिल्ह्याला अतिवृष्टी, पूर, वादळे यांसारख्या नैसर्गिक आपत्तींनी झोडपून काढले आहे. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही झाले आहे. त्यामुळे जर अशा प्रकारच्या आपत्तीच्या काळात उपाययोजना करून योग्य ती कार्यवाही करणे सोपे होणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर या जिल्ह्यांमध्ये हे ११ बहुद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यासाठी येणाऱ्या ४२ कोटी ३९ लाख ४७ हजारांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
रायगड जिल्ह्यासाठी तीन निवारा केंद्रे उभारण्यात येणार होती. त्यापैकी अलिबाग तालुक्यात आवास येथे बांधण्यास योग्य जागा न मिळाल्याने तेथील केंद्रे रद्द करण्यात आले आहे. श्रीवर्धन तालुक्यात दिघी आणि बोर्ली येथे निवारा केंद्र बांधण्यात आले आहे.
४२ कोटींच्या खर्चाला मान्यता
निवारा केंद्रांसाठी ४२ कोटी ३९ लाख ४७ हजारांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या केंद्रांचा उपयोग आपत्तीच्या वेळी निवारा केंद्र म्हणून आणि इतर वेळेला व्यावसायिक दृष्टिकोनातून केला जाणार आहे. यातून निवारा केंद्राचा खर्च भागवता येणार आहे.
रायगडमधील संभाव्य आपत्ती:
१. त्सुनामी- रायगड जिल्हाला २४० किलोमीटरचा सागरी किनारा आहे. त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तींचा किनारी भागाला फटका बसला, तर त्यापासून बचाव करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात येत आहे. यासाठीही या केंद्राचा उपयोग होणार आहे.
२. वायुगळती- जिल्ह्यात महाड, विळे-भागाड, धाटाव, पाताळगंगा, खोपोली यासारख्या रासायनिक कारखान्यांच्या वसाहती आहेत. या वसाहतींमध्ये वायुगळतीच्या घटना वारंवार घडत असतात. या वेळी खबरदारी म्हणून गावे खाली केली जातात. या वेळेला निवारा म्हणून या केंद्राचा उपयोग होऊ शकतो.
३. पूर परिस्थितीत- मुसळधार पावसात पूर परिस्थितीची निर्माण होते. पूरग्रस्तांच्या निवाऱ्याचा प्रश्न प्रशासनाच्या समोर असतो.
४. दरडग्रस्तांना तात्पुरता निवारा- दरड कोसळल्यास पूर्ण सुविधा असलेल्या निवारा केंद्राची गरज भासते. शाळा, मंदिरे यासारख्या ठिकाणी त्यांना ठेवण्यात येते.
आपत्तीकाळात निवाऱ्याची गरज असते. सर्व सुविधांनी सुसज्ज अशा केंद्राची रायगड जिल्ह्यासाठी गरज आहे. या केंद्राचा उपयोग इतर कामासाठीही केला जातो. श्रीवर्धन तालुक्यात दिघी आणि बोर्ली येथे निवारा केंद्र बांधण्यात आले आहे.
- सागर पाठक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रायगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.