पालघर, ता. १० (बातमीदार) : पोलिस असल्याची बतावणी करून बोईसरमधील ज्येष्ठ नागरिकाला व्हाॅट्सॲप कॉल करून अंधेरी पोलिस ठाण्यातून बोलत आहे, असे भासवून डिजिटल अरेस्ट करण्यात आले होते. त्यांना गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत त्यांच्याकडून तीन कोटी ५६ लाख ६० हजार रुपये आपल्या बँक खात्यात वळते करण्यास भाग पाडत त्यांची फसवणूक केली होती. याप्रकरणी पालघर पोलिसांनी आठ संशयितांना अटक केली आहे. पालघर जिल्ह्यात डिजिटल अरेस्ट करत फसवणुकीचा पहिलाच गुन्हा दाखल आहे.
बोईसर येथील अनिलकुमार आरेकर यांना प्रदीप सावंत याने फोनवरून संपर्क केला. त्याने आरेकर यांना चुकीच्या व्यवहारात तुमचा क्रमांक सापडल्याचे सांगून हे प्रकरण सीबीआयकडे गेल्याचे सांगितले. तुमची पोलिस कोठडी घ्यायची आहे. आम्हाला सहकार्य केले नाही, तर १० मिनिटांत पोलिस तुमच्या घरी येतील, असे सांगत त्याने त्याचा साथीदार प्रमोद भोसले याला संपर्क करून तो सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले. या दोघांनी आरेकर यांना बोलावून गुंतवून तुम्हाला गुन्ह्यातून बाहेर पडायचे असेल, तर तुमच्या खात्यातील पैसे चौकशीसाठी रिझर्व्ह बँकेत पाठवावे लागतील. सीबीआय चौकशी पूर्ण झाल्यास तुमचे पैसे परत दिले जातील, असे भासवून टप्प्याटप्प्याने तीन कोटी ५६ लाख ६० हजार रुपये पाठवण्यास सांगितले, मात्र याप्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात येतात आरेकर यांनी बोईसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
आंतरराष्ट्रीय कनेक्शन!
बोईसर पोलिसांनी सायबर पथकांच्या मदतीने कोणताही पुरावा नसताना कसोशीने तपास करून नागपूरमधून चार, भरूच येथील तीन, बिहारमधून एक अशा एकूण आठ जणांना अटक केली. या संशयितांमध्ये सैफ अन्सारी, फैज रिजवान, शोएब रिजवान, गुणवंत मते, झकरिया असरार, शोएब मोहम्मद, रिजवान साबीर, बाबर सिराज अशा आठ लोकांना अटक केली आहे. या गुन्ह्याच्या प्राथमिक तपासामध्ये आंतरराष्ट्रीय लिंक असल्याचे दिसून आले. यासाठी पडताळणी पथक नेमण्यात आले असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.