कर चुकव्यांवर कारवाईचा बडगा
नवी मुंबई एपीएमसी ॲक्शन मोडवर: १० दिवसांत ११ लाखांचा दंड वसूल
वाशी, ता.१० (वार्ताहर) : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (एपीएमसी) सभापती म्हणून प्रभू पाटील यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी त्यांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पाटील यांनी सर्वात प्रथम दक्षता पथकात बदल करून नवीन आणि अधिक प्रभावी पथक तयार केले आहे. या पथकाने मागील १० दिवसांत धडक कारवाई करत बाजार समितीचा कर (सेस) न भरता मोठ्या प्रमाणात मालाची आयात करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
व्यापारी बाजार समितीची अधिकृत परवानगी (लायसन्स) न घेताच आपला व्यवसाय करत होते. दक्षता पथकाने अशा परवानगी नसलेल्या आयातदारांच्या आणि कर चुकवणाऱ्या व्यापाऱ्यांच्या गाड्या पकडण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत अशा सात गाड्या पकडण्यात आल्या आहेत. यामध्ये मोठ्या कंटेनरचाही समावेश आहे. पकडलेल्या मालाची अंदाजित किंमत सुमारे सहा कोटी रुपये आहे.
या कारवाईत वेलची, लवंग, बासमती तांदूळ, चवळी, सूर्यफूल, नाचणी आणि राजमा यांसारख्या मालाचा समावेश आहे. या कारवाईतून आतापर्यंत जवळपास ११ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. या कठोर कारवाईमुळे बाजार समितीच्या परवानगीशिवाय मालाची आयात, निर्यात आणि किरकोळ व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
..................
व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले
दक्षता पथकाची कारवाई आपल्यावर कधीही होईल, या भीतीने अनेक व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या दक्षता पथकात बाजार समितीचे सचिव पी. एल. खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपसचिव महेश साळुंके पाटील, अनंत पारदुले, संजय खांडेकर, अजित नारंगकर आणि विनीत उबाळे यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर, सर्व व्यापाऱ्यांनी अनधिकृतपणे व्यापार, आयात-निर्यात करण्याऐवजी बाजार समितीची अधिकृत परवानगी घेऊनच आपला व्यवसाय करावा, असे आवाहन सभापती प्रभू पाटील यांनी एपीएमसीतील सर्व व्यापाऱ्यांना केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.