वाशी, ता. १३ (वार्ताहर) : आजच्या युगात ‘वापरा आणि फेका’ या जुनाट विचारसरणीला सोडून वस्तूंचा पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी केले. ‘टेक, मेक, डिस्पोज अँड रि-मेक’ या आधुनिक दृष्टिकोनामुळे प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात ‘पर्यावरणातील अर्थशास्त्र’ विषयावर एकदिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी ते बोलत होते. या परिषदेत पर्यावरण रक्षणाची सुरुवात प्रत्येक व्यक्तीने स्वतःपासून करणे आवश्यक असून, नव्या पिढीने या जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे, असे सिद्धेश कदम यांनी सांगितले. ही परिषद महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि डी. वाय. पाटील विद्यापीठ, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नेरूळ येथील सेंटर ऑफ एक्सलन्स येथे आयोजित करण्यात आली होती. या वेळी आयआयटी मुंबईचे इंद्रकांत झा, मटेरियल रिसायकल असोसिएशन ऑफ इंडियाचे सेक्रेटरी जनरल अमरसिंग, डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या विश्वस्त राजलक्ष्मी पाटील, टेक्नो वेस्ट मॅनेजमेंटचे सीईओ भूषण कापसे यांनीही मार्गदर्शन केले. या परिषदेला उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पर्यावरण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------
नव्या पिढीला प्रेरणादायक
आपल्या दैनंदिन सवयींमध्ये सकारात्मक बदल केल्यास पर्यावरण संरक्षण शक्य आहे. यासाठी तरुण पिढीचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक आहे, असे मत सिद्धेश कदम यांनी मांडले. प्रदूषणाच्या समस्यांवर अनेक संस्था नावीन्यपूर्ण उपाय शोधत आहेत. जालना आणि जळगावमधील काही उद्योग टाकाऊ वस्तूंमधून उपयुक्त उत्पादने निर्माण करत आहेत. असे उपक्रम नव्या पिढीला प्रेरणा देतील, असे मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले.
-----------------
‘ग्रीन बिल्डिंग’मधून वीज बचत
विद्यापीठाचे अध्यक्ष आणि कुलगुरू डॉ. विजय पाटील यांनी, पर्यावरण रक्षणासाठी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यापीठाने उभारलेली ‘ग्रीन बिल्डिंग’ ही सौरऊर्जेवर चालणारी आणि कमीतकमी ऊर्जेचा वापर करणारी असून, तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे. अशा उपक्रमांतून समाजात सकारात्मक बदल घडवता येतो, असे ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.