बदलापूर, ता. १३ (बातमीदार) : पाश्चात्य आणि आधुनिकतेला अर्वाच्य भाषेची लागलेली जोड फोडण्यासाठी आणि सध्या लहानातल्या लहान विद्यार्थ्यांच्या तोंडातून सर्रासपणे बाहेर पडणारी शिवी थांबवण्यासाठी; तसेच विद्यार्थ्यांना पुन्हा चांगल्या विचारातून घडवण्यासाठी ‘शिवीमुक्त शाळा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून सद्यस्थितीला अत्यंत गरजेचे असे अभियान संपूर्ण मतदारसंघात राबवण्यात येणार असल्याचे आमदारांनी सांगितले.
बदलापूर पूर्वेकडील आदर्श विद्यामंदिर येथील सभागृहात, आमदार कथोरे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील अनेक शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालकांची एकत्रित सभा घेण्यात आली. या सभेत मोठ्या संख्येने पालकांची उपस्थिती होती. सध्याच्या पिढीतील लहानातल्या लहान मुलांच्या तोंडात सर्रासपणे शिव्या ऐकायला मिळतात. आजची ही मुले एकमेकांना आवाज देतानाही अर्वाच्य भाषेत आणि शिव्या देत एकमेकांशी संभाषण करताना पाहायला मिळत आहे. हीच गंभीर बाब ओळखून आमदार कथोरे यांनी ‘शिवीमुक्त शाळा’ संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे. आताच्या पिढीला चुकीच्या मार्गाला जाण्यापूर्वी थांबविण्यासाठी पहिला प्रयत्न म्हणून विद्येचे माहेरघर म्हणजेच शाळेत ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. यासाठी आगामी शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच येत्या जूनपासून मुरबाड मतदारसंघातील प्रत्येक शाळांमध्ये शिक्षक व मुख्याध्यापक; तसेच पालकांच्या एकत्रित सहकार्यातून मुलांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. वेळ पडल्यास शिव्या देणाऱ्या मुलांसाठी थोडी सक्ती करत, त्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. हे अभियान राबवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने एकत्रित बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत सर्व शाळांतील शिक्षक, मुख्याध्यापक, त्याचबरोबर पालकांनी सकारात्मक प्रतिसाद देत एक चांगला उपक्रम हाती घेतल्याचे मत व्यक्त केले आहे.
विद्यार्थी विसरताहेत शिस्त
८० आणि ९०च्या दशकातील व त्यापूर्वीही शाळेमध्ये जाताना शिस्त, मग ती वावरण्यातली असू दे किंवा वागण्या-बोलण्यातील असो. प्रत्येक विद्यार्थी त्याचे पालन करत होता. सध्याची पिढी पाश्चात्य संस्कृती स्वीकारत, आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे. वागण्या-बोलण्यातील शिस्त विसरत चालली आहे. त्यात विद्यार्थी शाळेमध्येही सर्रासपणे चुकीच्या भाषेत संभाषण, शिव्या देऊन एकमेकांशी संवाद साधत आहेत.
येत्या जूनपासून मतदारसंघातील प्रत्येक शाळेमध्ये आवर्जून हे अभियान राबवले जाणार आहे. लवकरच मतदारसंघातील सगळ्या शाळा आणि सगळेच विद्यार्थी ‘शिवीमुक्त’ होतील.
- आमदार किसन कथोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.