तुळजाभवानीचा ठाण्यात निवास
गणेशवाडी-पाचपाखाडी येथे भव्य मंदिराची उभारणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांचे आराध्य दैवत असलेल्या आदिशक्ती आई तुळजाभवानीचे दर्शन ठाणे शहरात होणार आहे. कारण शहरातील गणेशवाडी-पांचपाखाडी येथे तुळजाभवानी देवीचे मंदिर साकारले असून राज्यभरातील भाविक दर्शनासाठी येत आहेत.
ठाण्यातील गणेशवाडी-पांचपाखाडी येथे आई तुळजाभवानीचे मंदिर उभारण्याचा निर्णय येथील नागरिकांनी घेतला होता; मात्र कालांतराने मंदिराचे काम रखडले. त्या वेळी डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेताना मंदिराचे बांधकाम पूर्ण केले आहे. काळ्या पाषाणातून हे मंदिर साकारले जावे; या मंदिरात आल्यानंतर तुळजापूरच्या मंदिराचा अलवार स्पर्श जाणवावा, अशी इच्छा डॉ. जितेंद्र आव्हाड यांची होती. याच इच्छेतून थेट तमिळनाडूचे सेलम अन् आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील दगडखाणीतून कृष्णशिळा शिव शंकराचे स्थान असलेल्या कर्नाटकातील मुरुडेश्वर येथे आणण्यात आल्या. असेंड क्रिएटीव्हचे संदीप लोट यांच्या सल्ल्यानुसार वास्तुविशारद संजय बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली दानश्री शिल्पकला केंद्राचे मंजुनाथ देवाडिगा यांनी या कृष्णशिळांना आकार देण्यास सुरुवात केली. शिखर कळस, नवग्रह, दगडीस्तंभ, आकर्षक कलाकुसर, हत्ती अशी विविध शिल्पे साकारली आहेत.
--------------------------------------------------------
२०२२ मध्ये भूमिपूजन
तुळजाभवानी देवीचे विद्यमान स्थितीमधील मंदिर जीर्ण झाले होते. त्यामुळे नवीन मंदिरासाठी शेजारीच असलेल्या उद्यानातील जागा ठाणे पालिकेकडून मिळवण्यात आली. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून आराखडा मंजूर करण्यात आला. शासकीय परवानगी आणि इतर बाबींची पूर्तता करून उभारलेल्या या मंदिराचे १८ फेब्रुवारी २०२२ रोजी भूमिपूजन करण्यात आले. मंत्रोच्चार, देवतांचे आवाहन, होम-हवन आदी सर्व विधींची पूर्तता करून हा सोहळा पार पडला होता.
-------------------------------------------
मंदिरातील प्रमुख वैशिष्टे
दोन हजार टन काळ्या पाषाणाचा वापर करून ३३ फुटांचा कलश अन् त्यासमोर नवग्रह, प्रवेश कलश, २६ स्तंभ, २० गजमुखांची आरास मंदिरासमोर हवनकुंड, १०८ दिव्यांची दीपमाळ आदींनी सुसज्ज, असे मंदिर येथे साकारले आहे. लोप पावत असलेल्या हेमाडपंथी शैलीला पुनर्जीवित करताना पाषाणाव्यतिरिक्त कोणत्याही अन्य साधनांचा वापर टाळण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.