वणव्यामुळे रानमेव्यांवर संक्रांत
आदिवासी महिला, बचत गटांना बसतोय फटका
श्रीवर्धन, ता. १३ (बातमीदार) : सध्या उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे जंगलात लागणाऱ्या वणव्याचा मोठा फटका डोंगरातील करवंदाच्या झुडपांना बसत आहे. परिणामी करवंदांचे उत्पादन घटल्याने आदिवासी महिला व स्थानिक महिलांच्या बचत गटांवर मोठा परिणाम होत आहे. श्रीवर्धनमध्ये सध्या अशा प्रकारचे विविध रानमेवा अखेरची घटका मोजत आहे.
करवंद हे आरोग्यास उपयुक्त फळ मानले जाते. त्यामध्ये जीवनसत्त्वे आणि औषधी गुणधर्म असल्याने त्याचा उपयोग विविध खाद्यपदार्थ, जॅम, लोणची आणि आरोग्यवर्धक पेय तयार करण्यासाठी केला जातो, मात्र गेल्या काही वर्षांपासून वाढत्या वणव्यांमुळे करवंदांची झाडे नष्ट होत चालली आहेत. परिणामी, दरवर्षी मिळणारे करवंद आता कमी प्रमाणात मिळत असल्याने आदिवासी महिलांच्या उदरनिर्वाहावर त्याचा परिणाम झाला आहे. करवंदाव्यतिरिक्त आंबे, जांभूळ, काजू, बोर यांच्याही झाडांवर वणव्याचा परिणाम होत आहे. यामुळे जंगलातील वनसंपदा कमी होण्याचा धोका वाढत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये रानातील जमिनी या विकसक आणि प्रकल्पअंतर्गत गेल्याने जमिनीवरील शेकडो एकर जंगले नष्ट झाली आहेत. अनेक ठिकाणी झुडुपांना समूळ नष्ट केले जात आहेत. त्यामुळे रानमेव्याचा हा प्रकार अखेरची घटका मोजत आहे. बागमांडला, बोर्लीपंचतन, श्रीवर्धन, वडवली तसेच दिघी या ठिकाणी करवंदे विक्रीसाठी उपलब्ध होत असतात, मात्र सध्या त्याच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याने बाजारात ते कमी प्रमाणात विक्रीसाठी येत आहेत.
........................
बचत गटांना मोठा फटका
स्थानिक आदिवासी व महिला बचत गटांचा करवंद गोळा करून त्यापासून उत्पादने तयार करण्याचा मोठा व्यवसाय आहे. वाळवलेले करवंद, जॅम आणि सरबत यांना चांगली मागणी असल्याने महिलांना रोजगार उपलब्ध होत असे, मात्र करवंदांचे प्रमाण घटल्याने या उत्पादनांना फटका बसत आहे.
..................
वाढत्या वणव्यांमुळे संकट
पर्यावरणतज्ज्ञांच्या मते, जंगलातील वाढते वणवे ही निसर्गासाठी मोठी आपत्ती ठरत आहेत. वाढती गरमी, मानवी हस्तक्षेप आणि निष्काळजीपणामुळे दरवर्षी वणव्यांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे केवळ करवंदच नव्हे, तर अनेक वनौषधी आणि इतर उपयुक्त झाडे नष्ट होत चालली आहेत.
................
पर्यायांचा शोध आवश्यक
- वन विभागाने आणि स्थानिक प्रशासनाने वणवे रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच, करवंदांचे कृत्रिम लागवड प्रकल्प राबवून या झाडांचे संवर्धन करणे गरजेचे आहे अन्यथा भविष्यात करवंद उत्पादन संपूर्णतः संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.