वाशी, ता. १३ (वार्ताहर) : नेरूळ येथील डीपीएस फ्लेमिंगो तलावात पुन्हा एकदा गुलाबी फ्लेमिंगोंचे आगमन होऊ लागले असून, पर्यावरणप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भरती-ओहोटीच्या पाण्याचा प्रवाह अंशतः पूर्ववत झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, यामुळे ही जैवविविधतेसाठी महत्त्वाची पाणथळ जागा पुन्हा सजीव होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
गेल्या काही वर्षांपासून काही स्वार्थी हस्तक्षेपांमुळे तलावातील नैसर्गिक जलप्रवाहात अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे या परिसंस्थेवर प्रतिकूल परिणाम झाला होता; मात्र स्थानिक पर्यावरणप्रेमींनी सातत्याने पाठपुरावा करून या ठिकाणी जलप्रवाह सुरळीत करण्याचे प्रयत्न चालवले होते. याचेच सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. शनिवारी (ता. १२) झालेल्या संयुक्त पाहणी दौऱ्यात नवी मुंबई खारफुटी विभागाचे अधिकारी, पर्यावरण संस्था आणि स्थानिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यानंतर या पुनरुज्जीवन प्रक्रियेबाबत अधिक माहिती देण्यात आली. सध्या तरी काही प्रमाणात पाण्याचा प्रवाह पूर्ववत झाला आहे, ही नक्कीच स्वागतार्ह गोष्ट आहे. तलाव पुन्हा पूर्वीच्या स्थितीत यायला वेळ लागेल; पण पुनरुज्जीवनाची सुरुवात झाली आहे हेच महत्त्वाचे आहे, असे पर्यावरण संस्था नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले.
----------------
तलावातील शेवाळ काढण्यात यश
सध्या मर्यादित पाण्याच्या प्रवाहामुळे तलावातील सुमारे ६० ते ७० टक्के शेवाळ काढण्यात आले आहे. भरती-ओहोटीच्या नैसर्गिक प्रवाहासाठी दोन्ही जलद्वार पूर्णपणे खुले करण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी सुधीर मांजरे यांनी दिली. वनमंत्री गणेश नाईक यांनी यापूर्वी नॅटकनेक्ट फाउंडेशनला दिलेल्या आश्वासनात म्हटले होते की, सिडको आणि नवी मुंबई महापालिका यांना आवश्यक ती पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डीपीएस तलाव पुन्हा फ्लेमिंगोंनी गजबजल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे नाईक यांनी ठामपणे सांगितले आहे.
----------------
रामसर कन्व्हेन्शन पात्रतेची पाणथळ जागा
डीपीएस तलाव हा ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्याच्या पाणथळ परिसंस्थेचा भाग आहे. या परिसराला रामसर कन्व्हेंशन म्हणजेच आंतरराष्ट्रीय महत्त्वाची पाणथळ जागा म्हणून मान्यता मिळण्याची पात्रता असून, फ्लेमिंगो तसेच इतर जलचर पक्ष्यांचे हे महत्त्वाचे अधिवास स्थान मानले जाते. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनेही या पाणथळ जागांचे संवर्धन अत्यावश्यक असल्याचे अनेक वेळा अधोरेखित केले आहे. अशा जागांमध्ये अडथळे निर्माण झाल्यास फ्लेमिंगोंना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात स्थलांतरित व्हावे लागते, ज्यामुळे विमान वाहतुकीलाही धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.