तणावमुक्त कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेचा पुढाकार
एआय तंत्रज्ञानाचा वापर; क्षमतावृद्धीकरिता कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १३ : सध्या गतिमान झालेल्या आयुष्यात प्रत्येकाला तणावाचा सामना करावा लागत आहे. खासगी तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना चोवीस तासामध्ये या तणावाला सामोरे जावून आपली जबाबदारी पार पाडावी लागते. विशेषकरून सरकारी कर्मचाऱ्यांना नागरिकांना अधिकाधिक दर्जेदार सोयीसुविधा देण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागते. त्यामुळे अशा सरकारी कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य अधिक स्वस्थ असणे गरजेचे असते. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचा तणाव मुक्त करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. नुकतेच कृत्रिम बुद्धिमतेचा वापर करून सर्व कर्मचाऱ्यांना तणावमुक्त आयुष्याचे तंत्रज्ञान शिकवण्याकरिता महापालिकेतर्फे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याला चांगला प्रतिसाद मिळाला.
कर्मचाऱ्यांच्या कामाची क्षमता वाढावी आणि नागरिकांना अधिकाधिक दर्जेदार सुविधा मिळाव्यात, त्याकरिता महापालिकेत कार्यरत कर्मचारी व अधिकाऱ्यांचे मानसिक आरोग्य अधिक स्वस्थ असण्याची गरज आहे. सध्याच्या युगात नव्याने आलेल्या एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सर्व कर्मचाऱ्यांना तणावमुक्त आयुष्याचे तंत्रज्ञान शिकवण्याकरिता महापालिकेतर्फे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. नेरूळ येथील कोर्टयार्ड हॉटेलमध्ये महापालिकेकडून कोणतेही पैसे न घेता या कार्यशाळेकरिता सभागृह मोफत देण्यात आले होते. या वेळी प्रत्येक विभागाने वर्षभरात करावयाच्या आपापल्या कामाची रूपरेषा ठरवून घेऊन त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, तसेच कार्यालयीन स्वच्छतेअंतर्गत केलेली अभिलेखाचे निंदणीकरण, नष्टीकरण व जतन ही कार्यवाही करण्याचा प्रत्येक वर्षीचा वेळ निश्चित करावा व त्यानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश या वेळी पालिका आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना दिले. तसेच आपण करीत असलेल्या प्रत्येक कामात सुधारणा करण्याची दृष्टी ठेवावी, हे सांगताना नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करावा, असेही आयुक्तांनी प्रामुख्याने सांगितले.
पुढील काळात एआयचा वापर सर्वच क्षेत्रात प्रभावीपणे होणार आहे. त्यादृष्टीने अधिकारी यांनी या तंत्रप्रणालीचा कार्यालयीन कामकाजात वापर करावा, या उद्देशाने विजयभूमी विद्यापीठाचे संचालक तथा एआयतज्ज्ञ डॉ. अर्पित यादव आणि असोसिएटस डीन डॉ. सालुर पटनाईक यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यामध्ये त्यांनी एआय तंत्रज्ञानाची विस्तृत माहिती देत प्रात्यक्षिकासह एआय वापराचा सराव करून घेतला. याकरिता प्रशासन विभागाने उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना आधीच सोबत लॅपटॉप अथवा टॅब घेऊन येण्याची सूचना दिली होती. मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे यांनी सादरीकरणाद्वारे अर्थसंकल्पानुसार प्रत्येक विभागाने जमा व खर्चाच्या बाजूच्या अनुषंगाने करावयाच्या नियोजन पद्धतीची सविस्तर माहिती दिली. आयुक्तांनी अर्थसंकल्पात मांडलेले १४७ संकल्प हे नवी मुंबई शहराचे व्हिजन असून, त्यानुसार कार्यवाही करण्याचे सूचित केले.
.....................
दुसऱ्या सत्रात नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्ते, उद्याने, पाणीपुरवठा आदी सोयीसुविधांच्या दर्जा नियंत्रणासाठी विकसित दक्ष ॲपची माहिती देणारे सादरीकरण नानासाहेब जाधव यांनी केले. यामध्ये त्यांनी थेट प्रक्षेपणात्मक सादरीकरण करून दक्ष ॲपची कार्यप्रणाली समजून सांगितली. या ॲपचा प्रभावी उपयोग करून आपल्या कामात सुधारणा घडविण्यासाठी संबंधितांनी पुढाकार घ्यावा, अशी सूचना आयुक्तांनी केली.
...................
न्यूट्रिशिअनतज्ज्ञ शिल्पी मल्होत्रा यांनी आरोग्याची काळजी घेणे, ही आपली प्रधान जबाबदारी असल्याचे सांगत आजारपणाला दूर ठेवण्यासाठी करावयाचे दैनंदिन व्यायाम, योगासने, आहार याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच उपस्थितांशी संवाद साधत त्यांच्या मनातील शंकांचे समाधान केले.
..........................
संमोहनतज्ज्ञ नवनाथ गायकवाड यांनी अत्यंत दिलखुलास शैलीत स्वयं व्यवस्थापन आणि क्षमता वृद्धी या विषयावर उपस्थितांशी हसत-खेळत संवाद साधत ताणतणावविरहित जीवनाचे महत्त्व सांगितले. तसेच त्यासाठी करावयाच्या छोट्या छोट्या गोष्टींची प्रात्यक्षिके करून घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.