वाणगाव, ता. १५ (बातमीदार) : मार्चनंतर जंगल, माळरानातल्या जाळ्यांमध्ये रानमेवा बहरू लागतो. आडरानात मिळणारा हा रानमेवा टोपल्यांत भरून बाजारात आला की भुरळ पडल्याशिवाय राहात नाही. अनेक लोक या रानमेव्याची खास वाट पाहात असतात. उन्हाळ्यात आंबा, कलिंगड, द्राक्षे ही फळे खाण्याची जितकी उत्सुकता तितकीच हा रानमेवा चाखण्याचीही खवय्यांना आस लागलेली असते.
पालघर जिल्ह्यातील आदिवासीबहुल लोकसंख्या पावसाळ्यात भातपीक आणि उन्हाळ्यात रानमेव्यावर आपली उपजीविका करते. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता आणि रोजगारनिर्मितीचे साधन उपलब्ध नसल्याने रानावनात तयार झालेल्या रानमेव्याला खवय्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. वाणगाव परिसरात पांढऱ्या रंगाच्या जामला बहर आला असून, तो बाजारात विक्रीसाठीदेखील दाखल झाली आहे.
बदलत्या हवामानाचा फटका बसूनही रानमेव्याने काही प्रमाणात तग धरला आहे. त्यामुळे यंदा प्रमाण कमी असले तरी खवय्यांचा हिरमोड झालेला नाही. सध्या वातावरणात बदल होत असल्याने रानमेव्याचे उत्पादन घटले आहे, मात्र सध्या आदिवासी बांधव राहिलेला रानमेवा बाजारात विक्रीसाठी घेऊन येत आहेत. या पारंपरिक व्यवसायातून आदिवासी महिलांना यातून चांगला रोजगार मिळतो.
वीस रुपये दराने विक्री
केवळ उन्हाळ्यात मिळणारा जाम आदिवासी महिला व पुरुष टोपलीत घेऊन बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. मागील वर्षी १० रुपयांना मिळणारा वाटा आता २० रुपये झाला आहे, तरीही खवय्ये आवर्जून तो विकत घेत आहेत. उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी पाण्याच्या तोडीचे काम करणाऱ्या पांढऱ्या जामसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात मागणी दिसून येत आहे.
पांढऱ्या जामचे फायदे :
- जाममध्ये सुमारे ९३ टक्के पाणी असल्याने उष्माघात आणि निर्जलीकरण टाळण्यासाठी उपयोग होतो.
- पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर होतात.
- अ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्याने दृष्टी सुधारण्यास मदत होते. मोतीबिंदूचा धोका कमी होतो.
- पांढरा जाम रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.
- जाममध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
- जाममध्ये क जीवनसत्व भरपूर असल्याने त्वचेच्या समस्या दूर होतात.
दिवसाला हजार ते बाराशे जामची फळे विकली जातात. उन्हाळ्याचे दोन ते अडीच महिने पांढरा जाम विकून घरखर्च चालवता येणे शक्य होते. पुढील महिनाभर फळे मिळू शकतील, असा अंदाज आहे. पांढरा जाम आरोग्यवर्धक असल्याने खवय्यांकडून मागणी आहे.
- सुरेश दुबळा, जाम विक्रेता, वाणगाव
उन्हाळ्याच्या हंगामात जाम फळे मोठ्या प्रमाणात तयार होतात. गोडसर, पाणीदार असे हे फळ आहे. यामध्ये व्हिटॅमिन क आणि अ मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. आरोग्य, रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी हे फळ उत्तम आहे. उन्हाळ्यात जामच्या सेवनाने शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होते.
- डॉ. एल. के. गभाले, उद्यानविद्या शास्त्रज्ञ, कृषी संशोधन केंद्र, पालघर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.