रोहा एमआयडीसीत कंपनीला आग
कंपनीचे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक
रोहा, ता. १५ (बातमीदार) : रोहा एमआयडीसी क्षेत्रातील खतनिर्मितीत अग्रगण्य असलेल्या ट्रान्सवर्ल्ड फर्टिकेम कंपनीला मंगळवारी (ता. १५) दुपारच्या सुमारास आग लागली. या आगीच्या घटनेमुळे एमआयडीसी क्षेत्रात खळबळ उडाली तसेच कामगारवर्गात एकच धावपळ सुरू झाली.
कोरोना आणि त्यानंतर युक्रेन विरुद्ध रशिया युद्धामुळे आयात-निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती. अशा परिस्थिती तग धरून बसलेल्या धाटाव एमआयडीसी येथील ट्रान्सवर्ल्ड कंपनीत आगीची ही घटना घडली. या कंपनीच्या मुख्य गेटसमोर ९० मीटर लांबीचे गोदाम आहे. या गोदामाच्या बाहेर वेल्डिंगचे काम चालू होते. या कामामुळे या ठिकाणी पडलेली ठिणगी धुमसत राहिल्याने ही आग लागली. गोदामाबाहेर पडलेल्या मटेरियल बॅगा आणि एफआरपी मटेरियलमुळे ही आग आणखी भडकली. दुपारी उन्हाचा कडाका वाढल्याने या आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या त्याचप्रमाणे सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केल्याने ही आग तासाभरात आटोक्यात आली. या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. कंपनी प्रशासनाची मात्र मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली. ही आग वेळेत आटोक्यात आल्याने या कंपनीच्या गोदामातील कोट्यवधी रुपयांचा तयार माल वाचविण्यात बचाव पथकाला यश आले अन्यथा या कंपनीवर मोठे आर्थिक संकट कोसळले असते. या आगीत लाखो रुपयांचे साहित्य व अन्य किमती वस्तू जळून खाक झाल्याने कंपनीचे लाखो रुपयांची नुकसान झाले आहे.
..
सुरक्षा अधिकारी गैरहजर
ट्रान्सवर्ल्ड फर्टिकेम कंपनीला मंगळवारी (ता. १५) दुपारच्या सुमारास आग लागली. या वेळी या कंपनीमध्ये सुरक्षा अधिकारी गैरहजर असल्याचे आढळून आले. कंपनीचे सुरक्षेच्या बाबतीत नियोजन ढिसाळ असल्याच्या तक्रारी या वेळी कामगारांनी केल्या. कामगारांना सेफ्टी शूज, हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, ग्लोज पुरवले जात नसल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण असल्याची माहिती पुढे आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.