धावत्या कारच्या डिक्कीत लटकता हात
लॅपटॉप विक्रीच्या प्रमोशनसाठी रील्स; चौघे ताब्यात
नवी मुंबई, ता. १५ (वार्ताहर) : एका कारच्या डिक्कीमधून एका व्यक्तीचा हात बाहेर आल्याचा व्हिडिओ सोमवारी (ता. १४) सायंकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, कोपरखैरणेतील चार तरुणांनी लॅपटॉप विक्रीच्या प्रमोशनचा व्हिडिओ रील्स तयार करण्यासाठी हा प्रकार केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी या चार तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करून त्यांची सुटका केली आहे.
वाशी ते सानपाडा रेल्वेस्थानकांलगतच्या सेवा रस्त्यावर सोमवारी एका कारच्या डिक्कीमधून एका व्यक्तीचा हात बाहेर आल्याचे काही वाहनचालकांच्या निदर्शनास आले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने काहींनी मोबाइलद्वारे त्याचा व्हिडीओ तयार करून तो व्हायरल केला. हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी धावाधाव सुरू केली. तपासात कारच्या नंबरवरून कारमालकाचा शोध घेतला असता, ही कार साकीनाका येथील व्यक्तीची असल्याची तसेच ही कार कोपरखैरणेत राहणाऱ्या मीनहाज शेख याने लग्नकार्यासाठी नेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर मीनहाज शेख याला ताब्यात घेतले असता त्याचे वाशीत लॅपटॉप खरेदी-विक्रीचे दुकान असल्याचे त्याने सांगितले.
तसेच लॅपटॉप विक्रीच्या प्रमोशनकरिता व्हिडिओ रील्स बनवताना त्यांनी कारच्या डिक्कीमधून मृत व्यक्तीचा हात बाहेर आला आहे, हे भासवण्यासाठी त्यांनी हा प्रकार केल्याचे सांगितले. मात्र यामध्ये तरुणांनी रील्स बनवण्यासाठी केलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याने सानपाडा पोलिसांनी मीनहाज मोहम्मद अमीन शेख (वय २५), शहावार तारीख शेख (वय २४), मोहम्मद अनस अहमद शेख (वय ३०) व इंजमाम अख्तर रजा शेख या चौघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याविरोधात मोटार वाहन कायद्याने कारवाई करून त्यांची सुटका केली.
एका कारच्या डिक्कीमधून एका व्यक्तीचा हात बाहेर आलेला प्रकार हा संशयित प्रकार नसून, काही तरुणांनी लॅपटॉप विक्रीचे प्रमोशन करण्यासाठी रील्स बनवताना हा प्रकार केल्याचे तपासात आढळून आले. जनतेमध्ये भीतीचे व घबराटीचे वातावरण पसरेल अशा प्रकारच्या अफवा, रील्स नागरिकांनी पसरवू नयेत तसेच डिजिटल माध्यमाच्या आहारी गेलेल्या नवीन पिढीने अशा प्रकारांपासून दूर राहावे.
- अजयकुमार लाडंग, सहाय्यक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.