ठाण्याला रंगायतनवर मानाचे स्थान द्या ः मुकुंद मराठे
राम मराठे, पी. सावळाराम, पेंडसे यांच्या तैलचित्रांसाठी पालिकेला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : ज्येष्ठ कलाकार संगीतभूषण पं. राम मराठे, कविवर्य गीतकार, साहित्यिक पी. सावळाराम आणि नटवर्य मामासाहेब पेंडसे यांनी ठाण्याला सांस्कृतिक ओळख मिळवून देत देश-विदेशात कीर्ती मिळवून दिली होती. त्यामुळे किर्लोस्कर, गडकरी आणि बालगंधर्व या महान कलाकारांप्रमाणेच गडकरी रंगायतनमध्ये त्यांना मानाचे स्थान देण्यात यावे, अशी मागणी ज्येष्ठ गायक, संगीत दिग्दर्शक मुकुंद मराठे यांनी ठाणे महापालिकेकडे केली आहे.
ठाण्याचे राम गणेश गडकरी रंगायतन म्हणजे शहराचा मानबिंदू आहे. नाट्यकर्मींची पहिली पसंत असणाऱ्या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम वेगात सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात असताना रंगायतन ठाण्यातील महान कलाकारांच्या नावानेही ओळखले जावे, त्यांच्या कार्याचे जतन व्हावे, किंबहुना नव्या पिढीला या कलाकारांची ओळख व्हावी, अशी इच्छा मुकुंद मराठे यांनी व्यक्त केली आहे. पं. राम मराठे हे वयाच्या दहाव्या वर्षापासून चित्रपट अभिनेते, चतुरस्त्र गायक, संगीत दिग्दर्शक, संगीत नाटक अभिनेते, गायक, नट होते. त्यांच्या नाट्यप्रयोगांची संख्या ७,५०० तर गायन मैफली सुमारे ४,००० झाल्या होत्या. कविवर्य पी. सावळाराम गीतकार, चित्रपट पटकथा लेखक आणि साहित्यिक होते. शिवाय तत्कालीन ठाणे नगरपालिकेचे ते नगराध्यक्ष होते. ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, नाट्यतपस्वी मामा पेंडसे हे महान अभिनेते म्हणून त्यांनी नाटक आणि चित्रपटसृष्टी गाजवली आहे. या तिन्ही कलाकारांचे ठाण्यामध्येच किमान ४० ते ५० वर्षे त्यांच्या अखेरपर्यंत वास्तव्य होते. या तिन्ही कलाकारांना संगीत नाटक अकादमी राष्ट्रपती सन्मान पुरस्कारासह विविध पुरस्कार लाभले असून, त्यांचे नावे ठाणे महापालिका दरवर्षी काही पुरस्कार प्रदान करते.
-----------------------------------------
नाट्यसंस्कृतीच्या जडणघडणीत योगदान
ठाणे महापालिकेच्या गडकरी रंगायतनच्या जडणघडणीत, रचनेमध्ये आणि मूळ उद्घाटनप्रसंगी या तीनही कलाकारांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यामुळे या कलाकारांची तैलचित्रे गडकरी रंगायतनच्या नूतनीकरणात करून महाराष्ट्रदिनी ठाणेकरांना अनोखी भेट देण्यात यावी, अशी आग्रहाची मागणी मराठे यांनी आयुक्तांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.