संदीप पंडित, विरार
काही वर्षांपूर्वी वसईची केळी, सुकेळी, फुले, भाजीपाला आणि दूध प्रसिद्ध होते. वसईच्या सुकेळ्यांची चव फार दूरवर पसरली होती, परंतु आता सुकेळीचा व्यवसाय काही मोजकेच शेतकरी करीत आहेत. त्यामुळे मुंबईसह अन्य बाजारांत ही केळी चांगलाच भाव खात आहेत.
वसईची केळी काही वर्षांपूर्वी देशभरात प्रसिद्ध होती. त्यांच्या उत्पादनासाठी अत्यंत पोषक वातावरण असल्याने सुमधूर चवीमुळे त्याला चांगलीच मागणी होती. या केळ्यांचे गुणगान चित्रपटातील अनेक गाण्यांतून, दृश्यांतून करण्यात आले होते. जसा देवगडचा हापूस, नाशिकची द्राक्षे आणि नागपूरची संत्री प्रसिद्ध आहेत, तशीच वसईची केळी आणि सुकेळी नावाजलेली होती. दरम्यान, गेल्या काही वर्षांत निसर्गाच्या लहरीपणामुळे केळींवर आलेल्या रोगांमुळे शेतकरी हवालदिल झाल्याचा परिणाम उत्पादनावर झाला. तसेच वाढत जाणाऱ्या बेसुमार नागरीकरणामुळे लागवडीचे क्षेत्र घटल्याचा परिणाम सुकेळीवर झाला आहे. आता वसईची केळी आणि सुकेळी दुर्मिळ होत चालली आहेत. सुकेळी सुकवणारे अगदी मोजकेच शेतकरी उरल्याचे चित्र आता वसईत पाहायला मिळत आहे. राजेळी केळ्याला उन्हात सुकवून सुकेळी तयार केली जातात.
गरिबांचे सकस अन्न समजली जाणारी, पारंपरिक पद्धतीने पिकवावी लागणारी, आंबटगोड चवीची, पिवळ्या रंगाची सुकेळी ही वसईची खास ओळख. मात्र आता सुकेळीची चव खुद्द वसईकरांना पारखी झाली आहे. आगाशी येथील मिलिंद म्हात्रे आणि त्यांचे कुटुंब हा व्यवसाय करीत आहेत. म्हात्रे यांसारखे शेतकरी अजूनही आपला वडिलोपार्जित व्यवसाय करीत आहेत. हा व्यवसाय त्यांचे पणजोबा नारायण म्हात्रे आणि परशुराम म्हात्रे यांनी सुरू केला होता. आज या व्यवसायात त्यांची चौथी पिढी आहे. राजेळी केळीपासून सुकेळी उन्हात सुकवून बनवली जातात. पूर्वी राजेळी केळी सोलून ती मचाणावर सुकायला ठेवली जात होती, परंतु आता पारंपरिक पद्धत सोडून काचेच्या पेटीमध्ये उन्हात सुकायला ठेवली जातात. त्यामुळे सुकेळी पूर्णपणे आरोग्यदायी असतात. पूर्वीपेक्षा राजेळी केळीचे उत्पादन वसईमध्ये कमी झाल्याने त्याचा परिणाम व्यवसायावर झाल्याची खंत मिलिंद म्हात्रे व्यक्त करीत केळ्याचा भावही वाढल्याचे सांगतात.
दहा दिवसांमध्ये रूपांतर
राजेळी केळ्यांचा भाव वाढल्याने सुकवलेल्या केळ्यांचाही भाव वाढला आहे. काचेच्या पेटीमध्ये ठेवलेल्या केळ्यांचे १० दिवसांत सुकेळीमध्ये रूपांतर होते. सध्या बाजारात ६०० रुपये किलोने सुकेळी विकली जात आहेत. पावसाळ्याचे चार महिने सोडल्यास आठ महिने सुकेळी तयार केली जातात.
केळ्यांमध्ये विविध जीवनसत्वांचे प्रमाण असते. त्याची आंबटगोड चवही चांगली असते, मात्र त्याबद्दल नवीन पिढीला माहिती नसल्यामुळे नेमकी वसईची सुकेळी काय आहेत, हे त्यांना ठाऊक नाही. यासाठी त्यांच्यात जागरूकता होण्याची गरज आहे. वसईमध्ये राजेळी केळ्याचे उत्पादन कमी झाल्याने त्याचा फटका सुकेळी बनविण्यास होत आहे. हा व्यवसाय टिकविण्यासाठी सरकारने आम्हाला मदतीचा हात द्यायला हवा.
- मिलिंद म्हात्रे, सुकेळी उत्पादक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.