नदी संवर्धनासाठी बोळा आंदोलन
उल्हास नदी बचाव कृती समितीचा इशारा
कल्याण, ता. २६ (बातमीदार) : उल्हास नदीसह नैसर्गिक नाल्यांमध्ये राजरोसपणे होत असलेल्या सांडपाणी विसर्गाला रोखण्यास प्रशासनाला अपयश येत आहे. याबाबत सातत्याने मागणी करूनही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. त्यामुळे आता उल्हास नदी बचाव कृती समितीने बोळा आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून प्रदूषणाकडे कानाडोळा करणारे शासकीय कार्यालये, राजकीय व्यक्ती, कारखाने, हॉटेल, रेसॉर्टचे सांडपाणी बोळा लावून रोखले जाणार आहे.
उल्हास नदीसह अनेक नद्यांमध्ये कारखाने, महापालिका, गावे आणि आस्थापनांच्या सांडपाण्याचा उघडपणे निचरा होत आहे. नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून आता अधिक गंभीर बनला आहे. सध्या उल्हास नदीतील जलपर्णीचा विळखा सोडवला जातो आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून यंत्रे घेतली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून उल्हास नदी बचाव कृती समिती, स्थानिक नागरिक, कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटनांनी वारंवार निवेदने, तक्रारी आणि जल परीक्षण अहवाल देऊनही शासन तसेच लोकप्रतिनिधींकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. परिणामी प्रदूषण वाढतेच आहे. याच पार्श्वभूमीवर आता उल्हास नदी बचाव कृती समितीने बोळा आंदोलनाची घोषणा केली आहे.
बोळा हा पारंपरिक मराठी शब्द आहे, जो पाण्याचा प्रवाह थांबवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अडथळ्याचा अर्थ सांगतो. शेतकऱ्याच्या भाषेत बोळा लावणे म्हणजे पाणी अडवणे. आता उल्हास नदी बचाव कृती समिती उल्हास नदीच्या प्रदूषणास जबाबदार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, राजकीय नेते कार्यालये, कारखाने, हॉटेल-रिसोर्ट, गृहसंकुले, महापालिका आणि ग्रामपंचायत यांच्या सांडपाण्याच्या प्रवाहाला अडवणार आहे, म्हणजे बोळा लावून आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती समितीचे शशिकांत दायमा यांनी दिली आहे.
स्वच्छता मोहीम राबवण्याची मागणी
उल्हास नदी बचाव कृती समितीने या आंदोलनाची घोषणा करताना विविध मागण्या केल्या आहेत. उल्हास नदीत सांडपाण्याचा प्रवाह तातडीने थांबवून सांडपाणी प्रक्रिया केंद्रे कार्यान्वित करावी. सध्याच्या प्रदूषणासाठी दोषी अधिकारी आणि जबाबदार संस्था यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. नदीच्या सभोवतालच्या परिसरात संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवावी. तसेच जनतेच्या सहभागातून नदी वाचवण्याचा कार्यक्रम तयार करावा, अशा मागण्या उल्हास नदी बचाव कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.