रायगडमध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेध
अनेक ठिकाणी स्थानिकांकडून मूक मोर्चा; बाजारपेठा बंद
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यटक मारले गेले. या घटनेचा निषेध म्हणून रायगड जिल्ह्यातील विविध शहरांत स्थानिकांकडून मूक मोर्चा तर अनेक ठिकाणी बाजारपेठा बंद करण्यात आल्या. या वेळी पाकिस्तानला जशात तसे उत्तर देण्यासाठी भारताने कठोर भूमिका घेण्याची मागणी नागरिकांनी केली. या घटनेचे पडसाद दिवसभरात पाहायला मिळाले. तसेच या भ्याड हल्ल्याबद्दल स्थानिकांमध्ये रोष दिसून आला.
पोयनाडमध्ये मूक मोर्चा
पोयनाड, ता. २६ (बातमीदार) : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यटक मारले गेले. या घटनेचा निषेध म्हणून अलिबाग तालुक्यातील पोयनाड बाजारपेठेत शुक्रवारी सायंकाळी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
पोयनाड नाका, पोयनाड बाजारपेठ ते जैन मंदिरापर्यंत शांततेत मूक मोर्चा काढण्यात आला. जैन मंदिराच्या प्रांगणात या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात निधन झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी नंदकुमार पाटील, हभप पद्माकर म्हात्रे, चंद्रकांत तावडे, भूषण चवरकर यांची भाषणे झाली. या मूक मोर्च्याच्या निमित्ताने हा हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या मूक मोर्चाला ग्रामस्थ मंडळ पोयनाड, व्यापारी वर्ग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, धर्मजागरण, वारकरी संप्रदाय यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.
..................
म्हसळा येथे दहशदवादी हल्ल्याचा निषेध
श्रीवर्धन, ता. २६ (बातमीदार) : म्हसळा तालुक्यात शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने म्हसळा येथील दिघी नाक्यावर तीव्र आंदोलन करण्यात आले. संतप्त कार्यकर्त्यांनी दहशतवाद्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त केला.
या आंदोलनात तालुका प्रमुख सुरेश कुडेकर, उपतालुका प्रमुख राजाराम तिलटकर, हेमंत नाक्ती, युवासेना तालुका अधिकारी कौस्तुभ करडे, शहरप्रमुख विशाल सायकर, तालुका संघटक कृष्णा म्हात्रे, दिलीप पानसरे, उप शहरप्रमुख दीपल शिर्के, महिला आघाडीच्या निशा पाटील, पवन मर्चंडे, शाखाप्रमुख दामोदर कांबळे, उपविभाग अधिकारी अजय पेरवी, विभाग अधिकारी कल्पेश पेरवी, भालचंद नाक्ती, उपशहरप्रमुख नौमान वसगरे आदी शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी शहीद झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करताना केंद्र सरकारने दहशतवाद्यांविरोधात कठोर पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
................
बाजारपेठ बंद करून कोलाडमध्ये निषेध
रोहा, ता. २६ (बातमीदार) ः हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड हद्दीत सकल हिंदू समाजातर्फे कोलाड नाक्यावरील बाजारपेठ बंद ठेवून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत कोलाडवासीयांनी आपला राग व्यक्त केला. जम्मू-काश्मीर येथील पहलगाममध्ये पर्यटक फिरायला गेले असता, मंगळवारी (ता. २२) जिहादी दहशतवाद्यांनी या पर्यटकांवर हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप २६ जणांचा नाहक मृत्यू झाला. या घटनेतील मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. या घटनेनंतर जगभरातून संताप व्यक्त होताना दिसत आहे. कोलाड हद्दीत अंबर सावंत मंदिर ते आंबेवाडी चौक येथे शुक्रवारी सकळ हिंदू समाजातर्फे एकत्र येत या घटनेचा निषेध व्यक्त करीत मृत भारतीय नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कोलाड नाका, रोहा-रोड आंबेवाडी नाक्यातील सर्व दुकाने सकाळी ९ ते ११ पर्यंत बंद ठेवण्यात आली होती. या वेळी कोलाड पंचक्रोशीतील सर्व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.