मुंबई

‘आजीबाईच्या शाळे’ला उन्हाळी सुट्टी

CD

बदलापूर, ता. २६ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील फांगणे गावात भरणाऱ्या ‘आजीबाईच्या शाळे’ला उद्यापासून उन्हाळी सुट्टी मिळणार आहे. शैक्षणिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी आजींनी पारंपरिक गणवेशात पाठीवर दप्तरे लावून शाळेत हजेरी लावली. शेवटचा दिवस आजींनी शाळेत रचलेली गाणी, ओव्या, गमतीदार खेळ आणि बाराखडी गिरवत साजरा केला. सुट्टी मिळण्याचा आनंद असला, तरी ज्या शाळेने आत्मविश्वास निर्माण करून दिला, त्याला आता महिनाभरानंतरच जाता येणार, याचे दुःखही आजींना होते. वय वर्षे ६० ते अगदी ९६ वर्षांच्या आजीबाई या शाळेत शिक्षण घेत आहेत.
मुरबाडपासून ३८ किमी अंतरावरील माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या फांगणे या ३०० लोकवस्तीच्या छोट्याशा गावात दरवर्षी शिवजयंती साजरी केली जाते. असेच २०१६च्या शिवजयंतीला सुरू असलेल्या पारायणात आम्हालाही लिहिता वाचता आले असते, तर आम्हीही पारायण केले असते, अशी इच्छा गावातील आजींनी व्यक्त केली होती. त्यांची हीच इच्छा येथील शिक्षक योगेंद्र बांगर यांनी विचारात घेत आजीबाईंची शाळा ही संकल्पना मांडली. या गावात एकूण ७० घरे आहेत. बांगर यांच्या संकल्पनेला गावकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. याच अनुषंगाने २०१६ मध्ये मोतीराम गणपत दलाल संस्था अंबरनाथ संचालित बांगर यांच्या नियोजनाखाली आजीबाईंच्या शाळेची मुहूर्तमेढ रोवली. पहिल्या शैक्षणिक वर्षात ३० आजीबाईंनी प्रवेश घेतला. अशा तऱ्हेने २०१६ पासून ते आता २०२५ पर्यंत नऊ वर्षे ही शाळा अविरतपणे सुरू आहे. याच गावातील शीतल मोरे या शिक्षिका या आजीबाईंना शिक्षण देत आहेत.

शाळा सुरू झाल्यानंतर उतार वयात का असेना शालेय शिक्षण, शाळेत जातानाचा आनंद, वर्ग सुरू असताना गप्पागोष्टी, एकमेकांच्या खोड्या काढणे, संगीत खुर्ची, गाणी अशा साऱ्याचा आनंद या आजीबाईंना घेता आला. महत्त्वाचे म्हणजे स्वतःचे नाव पाटीवर जेव्हा पूर्णपणे लिहिता आले, तो आनंद शब्दांत व्यक्त करण्यासारखा नाही, अशा प्रतिक्रिया या आजीबाईंनी दिल्या. काही वर्षांपूर्वी सोनी मराठीवर सुरू असणाऱ्या लोकप्रिय कोन बनेगा करोडपती या कार्यक्रमात आजीबाईंच्या शाळेतील सगळ्या आजीबाई आणि संस्था चालकांना आमंत्रित केले होते. या वेळी अभिनेता अमिताभ बच्चन यांनीही आजीबाईंच्या पायांना हात लावून आशीर्वाद घेतले होते.

फांगणे गावात आजीबाईची शाळा २०१६ मध्ये सुरू केली. या नऊ वर्षांत गावातील सगळ्या आजीबाई शिक्षण घेत असल्याने गाव १०० टक्के साक्षर गाव म्हणून पुढे आले आहे. या उपक्रमासाठी मी माझे प्रयत्न केले, यातच माझे खरे भाग्य आहे.
- योगेंद्र बांगर (प्रणेते),
आजीबाईंची शाळा, फांगणे

आजीबाईंना शिक्षण देण्याचे काम हाती घेतले, त्या वेळी हे काम सोपे जाईल, असे वाटत होते. मात्र, लहान मुलांपेक्षा उतारवयातील आजीबाईंना शिकवणे त्याहून कठीण आहे. कारण या वयात दृष्टी कमी होणे, इतर आजारपणामुळे अक्षरे वाचण्यास, ओळखण्यास अडचण होणे, सांधेदुखीचा त्रास त्यामुळे हातात खडू किंवा पेन्सिल पकडली की, त्यांचे हात थरथरत असतात. मात्र, याही वयात शिक्षण घेण्याची जिद्द या आजीबाईंमध्ये सगळ्यात जास्त होती. त्यामुळेच ही उमेद घेऊन मी सुद्धा त्यांना शिक्षण देत आहे. आजीबाईंचा तितकाच सकारात्मक प्रतिसाद मिळतो.
- शीतल मोरे, शिक्षिका
आजीबाईंची शाळा

माझे वय ७५ वर्षे आहे. १८ जणांचे मिळून आमचा एकत्रित कुटुंब आहे. माझी मुले शिकली, नातवंडेही शिकून नोकरीनिमित्त बाहेरगावी गेली. या सगळ्यांना बघताना आपल्यालाही लिहिता-वाचता यावे, अशी इच्छा निर्माण झाल्याने, नऊ वर्षांपासून मी या शाळेत शिकत आहे. शिक्षण घेतल्यामुळे आता समाजात वावरण्याचा एक वेगळा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. वाचता येत असल्यामुळे एसटीने प्रवास करणे, रेशन दुकानात जाऊन धान्य घेताना सही करताना अभिमान वाटतो. त्यामुळे शिक्षण हे सगळ्यांनी घेतलेच पाहिजे.
- सोनाबाई केदार, विद्यार्थिनी
आजीबाईंची शाळा (फांगणे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT