भिवंडीत फर्निचर गोदामाला भीषण आग
भिवंडी, ता. २६ (वार्ताहर) : राहनाळ ग्रामपंचायतीमधील मुनीसुरत कम्पाउंडनजीकच्या स्वागत गोदाम कॉम्प्लेक्स या ठिकाणी असलेल्या फर्निचर गोदामाच्या इमारतीस भीषण आग लागल्याची घटना शनिवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास घडली.
तळ अधिक तीनमजली असलेल्या या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात प्लायवूड, रेगझिन, फोम, केमिकल सोल्युशन साठवलेले असल्याने ही आग पसरत गेली. त्यामुळे संपूर्ण इमारत आगीच्या भक्षस्थानी पडली आहे. ही आग एवढी भीषण होती की आगीचे लोट सुमारे १० किलोमीटर अंतरावरून दिसत होते. या आगीची माहिती मिळताच भिवंडी येथील दोन तर कल्याण व ठाणे येथील प्रत्येकी एक अशा चार अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीच्या भक्ष्यस्थानी इमारतीमधील १२ गोदामे आली असून, आगीच्या ज्वालांनी क्षतिग्रस्त होत इमारतीचा बराचसा भाग कोसळला. या आगीच्या भीतीने नजीकच्या गोदामातील माल सुरक्षित बाहेर काढण्यासाठी कामगारांनी धावपळ सुरू केली होती, तर शेजारी असलेल्या इमारतीमधील सर्व कुटुंबीय आपल्याकडील मौल्यवान साहित्य घेऊन बाहेर सुरक्षितस्थळी जाऊन थांबले होते. या आगीवर नियंत्रण मिळविताना अग्निशामक दलाचे जवान हरिश्चंद्र वाघ हे जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत. दरम्यान, या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याची कमतरता भासत असल्याने आग आटोक्यात आणण्यात किमान १२ तासांहून अधिक वेळ लागू शकतो, अशी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी राजेश पवार यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.