एल्फिन्स्टन पूल पाडकामाचा स्थानिकांना फटका
पिढ्यानपिढ्या चालत आलेले व्यवसाय होणार बंद; पुलाखालील विक्रेत्यांना चिंता
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता २६ : वरळी-शिवडी एलिव्हेटेड मार्गाच्या कामासाठी एल्फिन्स्टन रेल्वे पूल सोमवारपासून (ता. २८) बंद केला जाणार आहे. हा पूल पाडल्यानंतर आम्ही कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न स्थानिक विक्रेते करीत आहेत. पुलाच्या आसपास स्थानिक पिढ्यानपिढ्या व्यवसाय करीत असून, त्यांनी पूल पाडण्यास विरोध केला आहे.
एल्फिन्स्टन पूल शुक्रवारी रात्री ९ वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार होता, मात्र सायंकाळी स्थानिक रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेत आधी पुनर्वसन करा, मगच पूल तोडा, अशी भूमिका घेतली. त्यामुळे पूल बंद करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. आता सोमवारपासून पूल बंद केला जाणार आहे. हा पूल पुढील दोन वर्षे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या पुलाखालील विक्रेत्यांचे घर या व्यवसायावरच चालते. त्यामुळे आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न विक्रेत्यांकडून विचारला जात आहे. फळे, फुले विकण्याचा व्यवसाय येथे स्थानिक करतात. तसेच स्टेशनरीची दुकानेदेखील आहेत.
एमएमआरडीएने या पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला होता. नवीन पूल बांधण्यासाठी सुमारे दोन वर्षांचा काळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुढील काही काळ मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागू शकते.
आमचा येथे गेल्या २२ वर्षांपासून व्यवसाय सुरू आहे. पूल बंद केल्यानंतर ग्राहकांवरदेखील परिणाम होणार आहे. दिवसाला एक हजार ५०० रुपयांचे नुकसान होणार आहे, असे विक्रेत्या मीनाक्षी धावडे हिने सांगितले. पूल तोडण्यात येणार असून, विक्रेत्यांची पर्यायी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे विक्रेत्यांचे हाल होणार आहेत, असे विक्रेता सुजय डोईफोडे याने सांगितले.
रुग्ण आणि नातेवाइकांचे हाल
केईम, टाटा आणि वाडिया या रुग्णालयांत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना १० रुपयांत शेअर टॅक्सीने जाता येत होते. आता टॅक्सी करून जावे लागणार आहे. त्यामुळे २१ रुपयांचा आणखी खर्च वाढणार आहे.
केईम, टाटा आणि वाडिया या रुग्णालयांत प्रवासी शेअर टॅक्सीने जातात. येथील ४० टॅक्सीचालकांचे घर यावर चालते. पूल बंद झाल्याने टॅक्सीचालकांचे नुकसान होणार आहे.
- संतोष साळुंके, टॅक्सीचालक
दररोज एक हजार ते एक हजार ५०० रुपयांचा व्यवसाय होतो. मुलगा वाॅचमनचे काम करतो, पण टॅक्सीमुळे घरखर्चाला आधार आहे. पूल बंद झाल्यास पूर्ण व्यवसाय बंद होणार आहे.
- मोहन सावंत, टॅक्सीचालक
गेल्या ४० वर्षांपासून एल्फिन्स्टन पुलाखाली फळविक्रीचा व्यवसाय करीत आहे. पूल बंद केल्यास ग्राहकही कमी होणार आहेत. दररोज एक हजार रुपयांचे नुकसान होणार आहे.
- छाया सोनावणे, विक्रेती
पूल बंद झाल्यास ५० टक्के ग्राहक कमी होणार आहेत. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
- संदीप डोईफोडे, विक्रेता
३० वर्षांपासून आमचा व्यवसाय आहे. माझी सासू व्यवसाय करीत होती. त्यानंतर पती हा व्यवसाय करीत होते. १४ वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाल्यापासून मी व्यवसाय करते. त्यावर घर चालवते. पुलामुळे दरराेज ४०० ते ५०० रुपयांचा फटका बसणार आहे.
- भावना परब, विक्रेती
एल्फिन्स्टन पूल बंद केल्यास चालायला रस्ता नसल्याने लोक येणार नाहीत. ग्राहकांवर परिणाम होईल. दररोज ५०० ते एक हजार रुपये मिळायचे.
- संगीता सोनावणे, विक्रेती
४० वर्षांपूवी वडिलांनी येथे व्यवसाय सुरू केला होता. २० वर्षांपासून मी व्यवसाय पाहत आहे. पुलामुळे ५० टक्के ग्राहक कमी होऊन नुकसान सोसावे लागेल.
- योगेश काशीद, विक्रेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.