कासा, ता. १२ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धानिवरीजवळील सुसरी नदीवरील पुलाची दुरुस्ती दीड वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावर रविवारी (ता. ११) पुन्हा एक मोठा खड्डा पडल्याने तातडीने बॅरिकेड्स लावून दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली. परिणामी, दोन्ही दिशांना एकेरी वाहतूक सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर कोंडी होत आहे. यामुळे चालक त्रस्त असून त्यांच्या नाराजीला तोंड फुटले आहे. विशेषतः अंबोली ते महालक्ष्मीदरम्यानचा मार्ग ठप्प होतो.
धानिवरी गावाजवळील सुसरी नदीवरील पुलाच्या जर्जर अवस्थेमुळे त्याची दुरुस्ती सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला गुजरातकडील मार्गिकेचे काम पूर्ण झाले; मात्र आता मुंबईकडील मार्गिकेवर मर्यादित वाहतूक सुरू असताना काम धीम्या गतीने सुरू आहे. तीन मार्गिकांच्या पुलावर सध्या एकेरी वाहतूक सुरू असल्याने मोठी वाहने अडकल्याने वाद होतात आणि अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून दुरुस्तीचे काम संथ गतीने आहे. पुलाची अवस्था लक्षात घेता, तो पाडून नव्याने उभारण्याची मागणी चालकांकडून होत आहे. या अपूर्ण कामांचा त्रास पावसाळ्यात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी पुलावर अनेक अपघात घडले. सध्या दोन्ही मार्गिकांवर काम सुरू असल्याने यंदाही कोंडीची शक्यता आहे. त्यामुळे महामार्गावरील ही कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. धानिवरीचे सरपंच शैलेश कोरडा यांनी सांगितले, की अनेक वर्षांपासून या जीर्ण पुलाचे काम सुरू असून तो पाडून नवीन पूल उभारणे, हीच योग्य दिशा ठरेल.
नवीन रस्त्यावरही खड्डे
महामार्गावरील नवीन सिमेंट काँक्रीट रस्त्याचाही काहीसा हाच प्रकार आहे. अधिकृतपणे घोडबंदर ते अच्छाडदरम्यान सुमारे ९८ टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगितले जाते; मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी अर्धवट काम, खड्डे आणि चढ-उतारांचे त्रास कायम आहेत. काही ठिकाणी नव्याने तयार केलेल्या रस्त्यावरही खड्डे पडत असल्यामुळे प्रवास अधिकच त्रासदायक झाला आहे.
उपाययोजनांचा अभाव
संध्याकाळी व रात्रीच्या वेळेस मोठ्या वाहनांच्या अडथळ्यांमुळे रुग्णवाहिका, प्रवासी वाहने व मालवाहतूक तासनतास अडकून राहते. येथे ना सूचनाफलक आहेत, ना वाहतूक नियोजनासाठी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. कंत्राटदाराकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने वाहनचालक वारंवार तक्रारी करीत आहेत. एखादा मोठा अपघात झाल्यास जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
धानिवरी पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने मागील पावसाळ्यात येथे अपघातांची मालिका घडली होती. त्यामुळे हे काम तातडीने पूर्ण व्हावे, अशी मागणी आम्ही सातत्याने करीत आहोत. हा पूल जुना असल्याने वारंवार दुरुस्ती न करता नव्याने उभारणे हाच उपाय आहे.
- ॲड. आशीष चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते
सध्या धानिवरी पुलावर दुरुस्ती सुरू असून मुंबई मार्गिकेवरही खड्डा पडल्याने तत्काळ दुरुस्ती हाती घेतली आहे. दिल्लीहून तज्ज्ञांची टीम पाहणीस येणार असून त्यांच्या अहवालानुसार पुढील काम ठरवले जाईल. हा पूल खूप जुना असल्यामुळे नवीन पुलाचीही आम्ही मागणी केली आहे. कोंडी टाळण्यासाठी ठेकेदाराला सूचनाफलक व सुरक्षा रक्षक नेमण्याचे निर्देश दिले आहेत. उर्वरित कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील.
- सुहास चिटणीस, महामार्ग प्रबंधक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.