कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात कल्याण विभाग अव्वल
महावितरणच्या चार कार्यालयांनी मारली बाजी
कल्याण, ता. २५ (वार्ताहर) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध १० विषयांवर शंभर दिवसांचा राज्यस्तरीय कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम घोषित केला होता. दुसऱ्या टप्प्यातील निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभाग कार्यालयाने बाजी मारली आहे. कल्याणस्थित कोकण प्रादेशिक विभाग कार्यालयाला द्वितीय, कल्याण परिमंडल कार्यालयास तृतीय, तर कल्याण मंडल-१ कार्यालयाला प्रथम आणि अहिल्यानगर मंडल कार्यालयाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांनी सर्व पुरस्कारप्राप्त कार्यालयांच्या प्रमुखांचे अभिनंदन केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम सुरू केला होता. हा उपक्रम राज्यातील सर्व ३५८ तालुक्यांतील १० हजार शासकीय कार्यालयांत राबविण्यात आला. सर्व शासकीय विभागांच्या प्रत्येक महसुली विभागातील प्रादेशिक, जिल्हा व तालुका स्तरावरील उत्कृष्ट तीन कार्यालयांची नुकतीच घोषणा करण्यात आली. महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाने प्रादेशिक पातळीवरील द्वितीय क्रमांक पटकावला आहे, तर जिल्हा स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत कल्याण मंडल-१ कार्यालयाने प्रथम क्रमांकाला गवसणी घातली आहे. सोबतच नाशिक महसूल विभागात जिल्हा स्तरावर अहिल्यानगर मंडल कार्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला.
तंत्रज्ञानाचा वापर
स्पर्धेसाठी वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर आदी निकष होते. गेले शंभर दिवस या कार्यालयांनी ठरलेल्या निकषांवर किती काम केले, त्यावरून निकाल घोषित केला आहे. यात महावितरणच्या बहुतांश कार्यालयांनी सरस कामगिरी करत या स्पर्धेत सर्वच निकषांवर आघाडी घेत पारितोषिकांना गवसणी घातली.
महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा, भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता संजय पाटील, नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता इब्राहिम मुलानी, रत्नागिरी परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल डोये यांनी ही नेत्रदीपक कामगिरी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.