सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे काम प्रगतिपथावर
ठाणे शहर पोलिसांचा दावा
काही ठिकाणी बसवलेल्या कॅमेऱ्यांद्वारे ठेवला जातोय वॉच
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ठाणे शहर पोलिस दलामार्फत आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात सहा हजार ५१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार ते बसविण्याचे काम हाती घेतल्यानंतर त्यामध्ये अडचणींची मालिका सुरू होती. मात्र आता त्यातून मार्गक्रमण करीत ते काम प्रगतिपथावर सुरू असल्याचा दावा पोलिसांमार्फत केला आहे. तसेच काही ठिकाणी सीसीटीव्ही बसविले आहेत. ते कॅमेरे तातडीने कार्यान्वितही करण्यात आले आहेत. तर लवकरच सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते कार्यान्वित होतील, असा विश्वासही एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.
ठाणे शहर पोलिस आयुक्तालय हा शहरापासून भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर असा पसरला आहे. वाढत्या नागरीकरणाने गुन्हेगारीचे प्रकारही वाढले आहे. त्यातच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने गुन्हे उघडकीस येत आहेत. गुन्ह्यांना वेळीच आळा बसावा आणि गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी शहर पोलिस आयुक्तालयात एक हजार ९९७ ठिकाणी सहा हजार ५१ इतके सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव पोलिसांनी तयार करून तो शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला होता. त्यास शासनाने नुकतीच मान्यता देत प्रकल्पासाठी ५७० कोटी ३० लाखांचा निधी मंजूर केला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम हाती घेतल्यानंतर अनेक अडचणी आल्या. पण त्यातून मार्ग काढत पोलिस दलामार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसण्यास सुरुवात झाली. त्यानुसार भिवंडीसह इतर शहरांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून, ते आता कार्यान्वित झाले आहेत. उर्वरित सर्व कॅमेरेही लवकरात लवकर बसविण्यात येतील, असा विश्वास पोलिसांकडून वर्तविला आहे.
कल्याणमध्ये एक हजार कॅमेऱ्यांद्वारे वॉच
कल्याण-डोंबिवलीत स्मार्ट सिटीअंतर्गत एक हजार कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ते सर्व कॅमेरे कार्यान्वित असून, त्याचे नियंत्रण ठाणे पोलिसांकडे असल्याचे एका अधिकाऱ्याने बोलताना सांगितले.
ठामपाने केले ३५० कॅमेरे पोलिसांकडे हस्तांतरित
ठाणे महापालिका हद्दीत ३५० सीसीटीव्ही कॅमेरे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रशासनाने बसवले आहेत. ते कॅमेरे ठाणे शहर पोलिसांकडे हस्तांतरित केले आहेत. याशिवाय आता पोलिस दलमार्फत पालिका हद्दीतील ९१७ ठिकाणी तीन हजारांहून अधिक कॅमेरे बसविण्यात येत आहेत. त्याचेही काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कॅमेरे बसविण्यास सुरुवातीला अडचणी आल्या, पण त्यावर मात देत आता सीसीटीव्ही बसविण्याचे कामे प्रगतिपथावर आहे. ज्या ठिकाणी कॅमेरे बसवले गेले आहेत ते कार्यान्वित झाले आहेत. लवकरच सर्व सीसीटीव्ही बसवून पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्र कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली येईल.
- प्रदीप कन्नलू, सहाय्यक पोलिस आयुक्त, ठाणे शहर पोलिस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.