पनवेल, ता. २५ (बातमीदार) : कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्व संबंधित यंत्रणांनी सज्ज राहण्याचे आदेश महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी दिले आहेत. यासंदर्भात आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०० ऑक्सिजन खाटा व सहा आयसीयू खाटा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. तसेच महापालिकेच्या मोल एक्स्पर्ट या आरटीपीसीआर प्रयोगशाळेमध्ये दररोज एक हजार ५०० आरटीपीसीआर चाचण्या करण्याची क्षमता असणारी यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आली आहे.
कोरोना आढावा बैठकीमध्ये कोविड संदर्भातील सद्यस्थितीचा, उपलब्ध सोयीसुविधांचा आढावा आयुक्तांनी घेतला. त्यानंतर त्यांनी कोविडसाठी सज्ज होण्यासाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पालिकेच्या आरोग्य विभागाने कोविडचा सामना करण्यासंदर्भात तयारी केली आहे.
कोविड रुग्णांच्या विलगीकरणाकरिता वायएमटी कॉलेजच्या निमिशा रुग्णालयात १०० खाटांचे सीसीसी विलगीकरण कक्ष उभारण्याची तयारी करण्यात आली आहे. तसेच कळंबोली डीसीएच येथे ३० ऑक्सिजन खाटा व सहा आयसीयू खाटा तयार ठेवण्यात आल्या आहेत. यामधील ऑक्सिजनचे सिलिंडर, पाइपलाइन यांची तपासणी, तसेच सर्व उपकरणांची दुरुस्ती व पुनर्तपासणी करण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटा आरक्षित करण्याबाबत व एमजीएम रुग्णालयामध्ये ५० खाटा आरक्षित ठेवण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. यानुसार संबंधित रुग्णालयांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. अशाप्रकारे किमान २०० ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा असणाऱ्या खाटा सुसज्ज करण्यात आल्या आहेत.
------------------
मुबलक ऑक्सिजन पुरवठा होणार
पनवेल महापालिकेच्या मोल एक्स्पर्ट या आरटीपीसीआर लॅबमध्ये दररोज एक हजार ५०० आरटीपीसीआर चाचण्या करण्याची क्षमता असणारी यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आली आहे. याकरिता आवश्यक रसायने उपलब्ध करण्यात आली आहेत. कोविडचा प्रादुर्भाव वाढल्यास आवश्यक ट्रसिंग व टेस्टिंगकरिता विशेष पथके तसेच डीसीएच, सीसीसी सेंटर येथे आवश्यक मनुष्यबळ इत्यादी तयार ठेवण्यात आले आहे. रुग्णालयात आयसीयू व ऑक्सिजनचे रुग्ण वाढल्यास ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपनीसोबतदेखील संपर्क करून मुबलक ऑक्सिजन पुरवठा होण्याबाबत दक्षता घेतली आहे.
--------------
खासगी यंत्रणांना सूचना
पनवेल महापालिका क्षेत्रात पूर्वी कोविड रुग्णालय म्हणून काम केलेल्या सर्व खासगी रुग्णालयांशी संपर्क साधून इच्छुक कोविड समर्पित रुग्णालयांसाठीची माहिती मागविण्यात आली आहे, तसेच आवश्यकता पडल्यास पूर्वीच्या कोविड लाटेतील कार्यरत रुग्णालयांना तातडीने सज्ज राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
--------------
‘पनवेल कनेक्ट’चा फायदा
पनवेल महापालिका क्षेत्रातील पालिकेच्या पाच रुग्णवाहिका तयार असून, इतर दोन रुग्णवाहिकांसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच खासगी रुग्णवाहिका सेवा, सरकारी रुग्णवाहिकांचे नंबर ‘पनवेल कनेक्ट’ या पालिकेच्या ॲपवर प्रसारित करण्यात आले आहेत. जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्ण ॲपद्वारे रुग्णवाहिकेशी तातडीने संपर्क साधू शकेल.
----------------------
२४ तास कॉल सेंटर
पनवेल महापालिकेचे २४x७ कॉल सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. पालिकेकडे असणाऱ्या ऑक्सिजनच्या एलएमओ व पीएसए प्लॅन्टची तपासणी करून तातडीने कार्यान्वित करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. खासगी रुग्णालय व लॅब यांना कोविड रुग्णाबाबत तातडीने माहिती देण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.