पुरुषांमध्ये वाढतोय प्रोस्टेट कर्करोग
वेळीच निदान झाल्यास उपचार शक्य; मुंबई, दिल्लीमध्ये वाढले प्रमाण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : पुरुषांमध्ये आढळणाऱ्या सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक, प्रोस्टेट कर्करोग पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनत आहे. अलीकडेच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाले आहे. गेल्या दोन दशकांत पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे भारतासाठी ही चिंतेची बाब आहे. १९९० च्या दशकात हा पुरुषांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगात ११ वा सर्वात सामान्य प्रकार होता. परंतु आता तो टॉप तीन कर्करोगांपैकी एक बनला आहे, असे एचसीजी कर्करोग रुग्णालयामधील युरो ऑन्कोलॉजी आणि रेडिएशन ऑन्कोलॉजी विभागाचे डॉ. गगन प्रकाश यांनी सांगितले.
विशेषतः मुंबई, दिल्ली आणि बंगळूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये प्रमाण वाढले आहे. तज्ज्ञांच्या मते, सुरुवातीच्या टप्प्यातच या प्रकारच्या कर्करागाचे निदान झाल्यास आणि वेळीच उपचार केल्यास रुग्ण दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगू शकतो.
भारतात दरवर्षी प्रोस्टेट कर्करोगाचे सुमारे ४० हजार नवीन रुग्ण आढळतात. गेल्या दोन दशकांमध्ये या प्रकरणांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. भारतात सरासरी वयानुसार समायोजित दर एक लाख पुरुषांमध्ये सहा-सात असा आहे, तर शहरी भागात हा दर एक लाख पुरुषांमागे ९-११ असा आहे. देशात प्रोस्टेट कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे, यात शंका नाही. कर्करोग नोंदणीमध्ये अनेक प्रकरणे नोंदवली जात नसल्यामुळे ही संख्या प्रत्यक्षात जास्त असू शकते, असे टाटा रुग्णालयाच्या रेडिएशन ऑन्कोलॉजी विभागाचे प्रा. डॉ. वेदांग मूर्ती यांनी सांगितले.
२०२४ मध्ये, टाटा मेमोरियल रुग्णालय (परळ) आणि ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर (ॲक्ट्रेक), खारघर येथे सुमारे एक हजार प्रोस्टेट कर्करोगाचे रुग्ण नोंदणीकृत झाले. प्रोस्टेट कर्करोग होण्यामागे जीवनशैलीतील बदल हे प्रमुख कारण आहे.
पाश्चात्य खाद्य सवयी आणि जीवनशैलीमुळेही रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रोस्टेट कर्करोग होण्यास कारणीभूत घटकांपैकी एक म्हणजे दीर्घायुष्य. आता अधिकाधिक पुरुष ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे असून, हे वय प्रोस्टेट कर्करोगासाठी सर्वात मोठे जोखीम घटक आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शहरी भागात पीएसए (प्रोस्टेट-विशिष्ट अँटीजेन) चाचणीचा वाढता वापर होत असल्याने रुग्ण अधिक प्रमाणात सापडत आहेत. एचसीजी कॅन्सर सेंटर बोरिवलीच्या रेडिएशन ऑन्कोलॉजी विभागात दरवर्षी सरासरी १०० नवीन प्रोस्टेट कर्करोग रुग्णांची नोंदणी केली जाते आणि त्यांच्यावर उपचार केले जातात. हा कर्करोग फक्त पुरुषांमध्येच होतो. रुग्णांचे सरासरी वय अंदाजे ७०-७५ वर्षे आहे.
अशी आहेत लक्षणे
सामान्य लक्षणांमध्ये लघवीच्या सवयींमध्ये बदल (वारंवार लघवी होणे, अधूनमधून लघवी होणे), लघवीमध्ये रक्त येणे (रक्तस्राव), रात्री वारंवार लघवी करण्यासाठी उठणे, लघवी करण्यास त्रास होणे किंवा लघवी रोखण्याची क्षमता कमी होणे यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.