खाटीक संघाच्या अध्यक्षपदी कॅप्टन नीलेश पेंढारी
विरार (बातमीदार) ः खाटीक समाज मटण विक्रेता संघाच्या अध्यक्षपदी कॅप्टन नीलेश पेंढारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समाजाला येणाऱ्या अडीअडचणीतून मार्ग काढण्यासाठी हिंदू मुस्लिम यांनी एकत्र येत वसई-विरारमध्ये खाटीक मटण विक्रेता संघाची स्थापना करण्यात आली. या संघाच्या अध्यक्षपदी कॅप्टन नीलेश पेंढारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे, तर कार्याध्यक्षपदी जितेंद्र कोथमीरे यांची निवड करण्यात आली आहे. खाटीक समाजाच्या हक्कासाठी ही संघटना लढणार असल्याचे पेंढारी यांनी सांगितले. या संघटनेमध्ये कोषाध्यक्षपदी सुनील जाधव, सरचिटणीस संतोष बागुल, उपाध्यक्षपदी रियाज कुरेशी, हेमंत लाड, जावेद शेख, विजय घोलपसह कोषाध्यक्षपदी अजय कोथमीरे यांच्यासह मोहसिन सव्वालाखे, अमोल कोथमीरे, इस्माईल शेख, रोहन पेंढारी, योगेश जाधव, मकलू कुरेशी, अल्ताफ शेख यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
.....................
सांडपाणी प्रकल्पातील अनधिकृत बांधकामे हटविण्याची मागणी
विरार (बातमीदार) ः वसई-विरार शहर महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक ८४ मधील गास येथील भू-मापन या शासकीय जमिनीवर सांडपाणी प्रक्रिया केंद्र नियोजित आहे. या जागेवर सध्या अनधिकृत अतिक्रमण झाले असून, त्यामुळे प्रकल्पाच्या कामात अडथळा येत आहे. त्यामुळे ही अनधिकृत बांधकामे हटविण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हासचिव जॉय फरगोस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्या पत्राची दखल घेत मुख्यमंत्री सचिवालयाने पालघर जिल्हाधिकारी आणि वसई-विरार महापालिकेला या प्रकरणाची चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत. वसई-विरार महापालिकेने यासंदर्भात प्रकल्पाकरिता सर्व संबंधित प्रस्ताव व आवश्यक कागदपत्रे शासन स्तरावर पाठविल्याचे सांगितले आहे. तथापि, प्रत्यक्षात अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही अद्याप झालेली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच ही जागा महापालिकेला हस्तांतरित झालेली नाही. हा सांडपाणी प्रकल्प स्थानिक नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि परिसरातील स्वच्छता व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या प्रकल्पाची विलंब न करता तत्काळ अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे या जागेवरील अतिक्रमण तत्काळ हटवावे, अशी आपकडून मागणी करण्यात येत आहे.
............
सेवा विवेकच्या ग्रामविकास कार्याचे राज्यपालांकडून कौतुक
विरार (बातमीदार) ः विरारजवळील सेवा विवेक संस्थेचे प्रतिनिधी यांनी राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी संस्थेच्या वतीने आदिवासी महिलांनी स्वतःच्या हस्तकौशल्यातून तयार केलेल्या बांबूच्या कलात्मक वस्तू आणि प्रेरणादायी पुस्तक त्यांना सप्रेम भेट देण्यात आली. या भेटीदरम्यान सेवा विवेकचे मार्गदर्शक व पद्मश्री रमेश पतंगे, सेवा विवेक संस्थेचे संस्थापक प्रदीप गुप्ता आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (बांबू हस्तकला) लुकेश बंड हे देखील उपस्थित होते. पालघर जिल्ह्यातील ग्रामविकासाच्या या अनोख्या उपक्रमाची राज्यपालांनी प्रशंसा केली. त्यांनी ग्रामीण आणि आदिवासी भागातील महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सेवा विवेक संस्था करत असलेल्या कार्याला प्रोत्साहन देताना म्हटले की, सेवा विवेकचे कार्य संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी सेवा विवेकच्या ग्रामविकास प्रकल्पास लवकरच प्रत्यक्ष भेट देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या आश्वासनामुळे संस्थेच्या कार्याला अधिक बळ आणि व्यापक ओळख मिळणार आहे.
..................
कर्करोग व्यवस्थापनावर राष्ट्रीय होमिओपॅथिक सेमिनार
विरार (बातमीदार) ः वसई–विरार असोसिएशन ऑफ होमिओपॅथिकतर्फे आयोजित केलेला कर्करोग व्यवस्थापनातील होमिओपॅथिक दृष्टिकोन या विषयावरील राष्ट्रीय सीएमई सेमिनार यशस्वीरीत्या पार पडला. या सेमिनारमध्ये देशभरातील १३० हून अधिक डॉक्टरांनी सहभाग घेतला. यामध्ये आंतरराष्ट्रीय डॉक्टरांचाही सहभाग होता. ही शैक्षणिक परिषद ओप्युलेंट हॉल, दत्तानी मॉल, वसई (पश्चिम) येथे पार पडली. यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून जागतिक कीर्तीचे होमिओपॅथिक कर्करोगतज्ज्ञ डॉ. ए. यू. रामकृष्णन यांनी त्यांच्या ४० वर्षांच्या व्यापक अनुभवातून कर्करोगाच्या होमिओपॅथिक उपचारांवरील प्रभावी प्रोटोकॉल, थेट केसेस व चिकित्सकीय दृष्टिकोन सादर केला. या कार्यक्रमास प्रमुख फार्मास्युटिकल कंपन्यांचे प्रायोजकत्व लाभले होते. या वेळी डॉक्टरांनी सभागृहात प्रत्यक्ष उपस्थित राहून तर काहींनी झूमद्वारे थेट सहभागी होण्याचा पर्याय निवडला होता. या कार्यक्रमात वसई–विरार असोसिएशन ऑफ होमिओपॅथिचे अध्यक्ष डॉ. अजय पेडणेकर म्हणाले की, हा कार्यक्रम केवळ शैक्षणिक नव्हता, तर तो संपूर्ण भारतातील होमिओपॅथिक वैद्यकिय तज्ज्ञांना एकत्र आणण्याचा प्रयत्न होता. जेणेकरून ते कर्करोगासारख्या गुंतागुंतीच्या आजारांमध्ये अधिक समजूतदार आणि प्रभावी उपचार करू शकतील. हा सेमिनार एक शैक्षणिक मैलाचा दगड ठरला आहे.
............
महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघाच्या अध्यक्षपदी ज्योती मेहेर
पालघर, ता. २७ (बातमीदार) ः महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघटनेच्या अध्यक्षपदी ज्योती मेहेर यांची निवड करण्यात आली आहे. ज्योती मेहेर सातपाटी गावच्या असून, त्या मच्छीमार समाजापैकी आहेत. गेली २५ वर्षे त्या सामाजिक, सहकारी, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. सातपाटी मच्छीमार सहकारी सोसायटीवर प्रथम त्या निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांची सहकार क्षेत्रातील सुरुवात सातपाटी मच्छीमार सहकारी सोसायटीपासून सुरू झाली. सध्या त्या ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघ, ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघाच्या सुवर्ण महोत्सवी अध्यक्ष व विद्यमान सदस्य आहेत. नॅशनल फिश वर्कर फोरम या राष्ट्रीय संघटनेच्या त्या सचिव होत्या. आता विद्यमान सदस्य आहेत. मच्छीमार कृती समितीच्या पालघर-ठाणे जिल्हा महिला संघटक व महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघावर तीन टर्म संचालिका म्हणून राहिल्या आहेत. नुकत्याच झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे. या संघावर ७५ वर्षाच्या इतिहासात प्रथमच महिला अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. मच्छीमारांच्या समस्या सोडविण्यासाठी या पदाचा वापर करणार, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्या निवडून आल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
................
वसई-विकास बँकेला उत्कृष्ट कामकाजाचा पुरस्कार
विरार (बातमीदार) ः वसई तालुक्यातील सर्वात मोठी बँक समजल्या जाणाऱ्या वसई विकास बँकेला इन्फो मीडिया या कंपनीने शेड्युल को. ऑपरेटिव्ह बँक, बेस्ट अर्बन को. ऑपरेटिव्ह बँक आणि बेस्ट डिजिटल बँक ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बँकेचे वरिष्ठ अधिकारी अशोककुमार तिवारी यांना बेस्ट कर्मचारी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सुमनेष जोशी, डेप्युटी डिरेक्टर जनरल कम्युनिकेशन मंत्रालय यांच्या हस्ते देण्यात आला. बँकेला मिळालेला पुरस्कार मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप ठाकूर यांनी स्वीकारला. वसई विकास बँकेच्या बोरिवली, वसई- विरार, नालासोपारा, पालघर, बोईसर, नाशिक, औरंगाबाद याठिकाणी शाखा असून गेली ४० वर्षे ही बँक सहकार क्षेत्रात आपले वेगळेपण जपून काम करत आहे. बँकेला मिळालेल्या या पुरस्कारात बँकेचे सभासद, हितचिंतक, कर्मचारी, अधिकारी आणि संचालक मंडळाचा मोठा वाटा असल्याचे बँकेचे चेअरमन आशय राऊत यांनी सांगितले. या सर्वांच्या पाठिंब्यामुळेच बँक विकासाकडे अग्रेसर आहे. आम्ही यापुढेही डिझिटल क्रांतीचे पाऊल चालत राहणार आहोत आणि ग्राहकांना चांगल्यात चांगली सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहोत, असे आशय राऊत यांनी या वेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.